अध्याय ५ वा
लेखक : श्री. बजरंग झेंडे
चरित्र : समुद्र भरला आहे
संदर्भ : कै. बाळासाहेब रामनाथ शिर्के लिखित श्री कृष्ण सरस्वती चरित्र .
(महानैवेद्य सेवा ग्रुप,कोल्हापूर)
(१) महारोगी ब्राम्हणाला श्रीकृष्ण सरस्वती महाराजांनी बरे केले.
अक्कलकोटहून श्रीकृष्ण स्वामींच्या बरोबर आलेल्या कुष्ठरोगी ब्राम्हणाचे कर्म संपत आले होते. एके दिवशी श्रीकृष्ण स्वामींनी त्याला जवळ बोलावून सांगितले की, “तुझी व्याधी, तुझा कुष्ठरोग आता नाहीसा झाला आहे. आता पंचगंगेत जावून स्नान कर व आपल्या घरी जा. नेहमी आमची आठवण ठेव”. यावर तो ब्राम्हण श्रीकृष्ण स्वामींना म्हणाला “माझी व्याधी, माझा कुष्ठरोग जावो अथवा न जावो, त्याची मला काळजी नाही. परंतू तुमच्या वियोगाने माझी सेवा अंतरेल याचे मला वाईट वाटते”. असे बोलून स्नानास गेला. पंचगंगेत स्नान करताच तो आश्चर्यचकित झाला. त्याची अंगकांती बदलून पूर्वी सारखी सुंदर झाली होती. कुष्ठरोगाचे नामोनिशान पुसले होते. आनंदाने बेहोष होवून तो श्री महालक्ष्मी मंदिराच्या पूर्वेकडील राम मंदिरात श्रीकृष्ण स्वामींच्या दर्शनासाठी त्वरीत परत आला. परंतु श्रीकृष्ण स्वामींचे त्याला दर्शन झाले नाही. त्याला अतिशय दु:ख झाले. त्याने तेथेच मुक्काम केला. श्रीकृष्ण देवांचा शोध घेतला परंतु सर्व व्यर्थ. कांही दिवसांनी त्याला श्रीकृष्ण देवांनी दृस्तांतात सांगितले “माझ्या आज्ञेप्रमाणे घरी जावून सुखाने संसार कर, माझे स्मरण कर, तुझे कल्याण होईल”. या दृस्तांतातील आज्ञेप्रमाणे तो ब्राम्हण आपल्या गांवी परत गेला.
(२) कोल्हापुरातील फडणीसांच्या घरी श्रीकृष्ण सरस्वती यांचे वास्तव्य
त्या काळी करवीरात फडणीस नांवाचा एक श्रीमंत गृहस्थ रहात होता. बायको, मुले, धन्यधान्य समृद्धी याने त्याचा संसार श्रीमंत होता परंतु संसारात त्याचे मन रमत नव्हते. नेहमी तो उदासवृतीने रहात असे. श्रीकृष्ण स्वामी हे कारणिक पुरुष असून ते सत्पुरुष आहेत असे त्याच्या कानावर गेले. श्रीकृष्ण स्वामींचा तपास करीत तो श्री महालक्ष्मी मंदिरात आला. श्रीकृष्ण स्वामींचे त्याने मनोभावे दर्शन घेतले. त्या दैवी सत्पुरुषाच्या दर्शनाने त्याला असे वाटू लागले की, श्रीकृष्ण स्वामींच्या जवळ कायम रहावे. त्यांची सेवा आपल्या हातून घडावी.फडणीसाच्या मनातील घालमेल ओळखून श्रीकृष्ण स्वामी त्याला म्हणाले “तुझ्या इच्छे प्रमाणे माझ्याजवळ राहायला मिळेल पण कठीण प्रकारे सेवा करावी लागेल.सेवाधर्म पाळावा लागेल. त्याचा विचार कर”.हे आपल्या मनातीलच विचार ऐकून श्रीकृष्ण स्वामी हे अवतारीच आहेत हे पटून त्यांना घरी घेवून आला व मनोभावे त्यांची सेवा करू लागला.फडणीसाची पत्नी भाविक नव्हती. ती कजाग बाई होती. तिची श्रीकृष्ण स्वामींच्यावर श्रध्दा नव्हती. ती असा विचार करी की, “आपला नवरा भोळसट असून, घरात लहान लहान मुले आहेत. अशात हा साधू म्हणून मूर्ख मनुष्य घरात आणून ठेवला आहे हे बरे नाही. कसला साधू ? हा आपल्या हाताने जेवत नाही. दुस-र्याने भरवावे लागते. बसल्या जागी हा शौच करतो. हा विपरीत मनुष्य आहे. याची सेवा त्रासदायक आहे. याच्या सेवेने काय लाभ आहे ?” म्हणून ती श्रीकृष्ण स्वामींना त्रास देवू लागली. एके दिवशी श्रीकृष्ण स्वामी फडणीसाला म्हणाले, “आता अशुभ वेळ आली आहे” श्रीकृष्ण देवांचे हे बोलणे फडणीसाला कळले नाही.
स्वामींच्या बोलण्याचा उलघडा झाला नाही.पुढे थोडयाच दिवसात फडणीसाचा लहान मुलगा तापाने वारला. मग काय विचारता? फडणीसाचा बायकोने मोठा आकांत केला.घरात आणलेला साधू नसून तो प्रत्यक्ष यमदूत आहे. त्याच्या मुळेच मुलगा गेला. अशा प्रकारची दुषणे ठेवून श्रीकृष्ण स्वामींची निर्भत्सना केली. ती ऐकून फडणीसाला खूप वाईट वाटले. त्याने बायकोची निर्भत्सना करून म्हणाला “तू दुष्ट, पापी स्त्री आहेस, श्रीकृष्ण स्वामींना दूषणे देवून तू कुठे पाप फेडशील. पुढील जन्मात तू नरकात जाशील” हा पतीपत्नीचा झगडा ऐकून श्रीकृष्ण स्वामी फडणीसाला म्हणाले “प्रपंचाचा तुम्हा पती-पत्नी वर पगडा आहे. लवकरच तुम्हांला आणखी मुले बाळे होतील”असे बोलून श्रीकृष्ण स्वामींनी फडणीसाच्या घराचा त्याग केला. फडणीसाने बराच आग्रह केला परंतु श्रीकृष्ण स्वामी दुसरीकडे निघून गेले.
३)स्व.श्रीमंत केदारराव शिंदे म्हैसाळकर यांच्या गावी श्री कृष्ण सरस्वती चे आगमन.
म्हैसाळकर या आडनावांचे एक संपन्न, धनिक, सदाचार संपन्न गृहस्थ त्यांच्या म्हैसाळ गांवी रहात होते. त्यांच्या घरी संतती, संपत्ती भरपूर असून, श्रीकृष्ण स्वामींच्या ठायी त्यांची निष्ठा, श्रद्धा होती. म्हैसाळहून ते नेहमी फडणीसाच्या घरी श्रीकृष्ण स्वामींच्या दर्शनाला येत. करवीरात वास्तव्य असल्याने नेहमी स्वामींचे दर्शन घेत. त्यांना नेहमी वाटे की, श्रीकृष्ण स्वामींचे पाय आपल्या घराला, वैभवाला लागावेत, त्यांच्या अंत:करणातील शुध्द भावना ओळखून एक दिवस श्रीकृष्णस्वामी त्यांना म्हणाले “तुमचा हेतू मला कळला. कांही दिवस वास तुमच्या गांवी होईल” आपल्या मनातील हेतू न सांगता श्रीकृष्णस्वामीस कसा कळला ? याचे आश्चर्य म्हैसाळकरांना वाटून राहिले व उतरोतर त्यांची श्रीकृष्णस्वामींच्या वरील श्रध्दा वाढत चालली. एके दिवशी दोन प्रहरी श्रीकृष्ण स्वामी फडणीसाच्या घरातून बाहेर पडले व म्हैसाळकरास म्हणाले की, “कांही कार्य करवीरात आहे ते आवरून म्हैसाळला जावू” ते ऐकून म्हैसाळकरास फार आनंद झाला व स्वामींच्या मागोमाग निघाले, तेथून श्रीकृष्णस्वामी कुंभार गल्लीत जावून महानसाध्वी तारामतीच्या घरां समोर उभे राहिले. म्हैसाळकरास ते म्हणाले “हेच माझे वसतीस्थान, घर” ताराबाईला हाका मारून “आई भोजन दे” म्हणू लागले. ताराबाई भिक्षा घेवून आली व श्रीकृष्ण स्वामींना बघताच म्हणाली “आपण तर बटू मूर्ती ब्राम्हण दिसता. मी शिजवलेले अन्न तुम्हांला कसे वाढू ? त्यापेक्षा तुम्हांला कोरडा शिधा देते आपण स्वयंपाक करून ग्रहण करावा”. ताराबाईने मला ओळखले नाही. तिची द्वैतभावना अध्याप दूर झाली नाही. तो पर्यंत आपण दुसरीकडे जावू” असा विचार करून श्रीकृष्ण स्वामी म्हैसाळकरांच्या सोबत म्हैसाळला निघून गेले.
(४) दर पौर्णिमेला नृसिंहवाडीला चालत जाणेचा ताराईचा नियम.
दर पौर्णिमेला नृसिंहवाडीला चालत जाण्याचा ताराबाईचा नियम होता. बरेच वर्षे हा नियम ताराबाईने पाळला होता. पण कर्मगती कोणास चुकली आहे. पुढे ताराबाईला पोटदुखीचा/ पोटशुळाचा आजार जडला.अन्न खाणे /पचणे जमेना.पोटदुखी राहिना. यातूनही नृसिंहवाडीला जाण्याचा नियम ताराबाईंनी चालविला. पोटदुखीमुळे, शरीर व्याधीमुळे, ताराबाईला आता नृसिंहवाडीला जाणे जमेना. एका पौर्णिमेला नृसिंहवाडीत मुक्कामाला असतांना ताराबाईने श्री दत्तात्रेयाला जड अंत:करणाने प्रार्थना केली. “व्याधीमुळे मला आता चालत येवून तुमचे दर्शन घेणे जमणार नाही. व्याधी आता मला सोसवत नाही. यातून आता मला लवकर मुक्त कर” जड अंत:करणाने तिने निरोप घेतला. ताराबाईचे शुध्द अंत:करण जाणून श्री गुरु दत्तात्रेयाने तिला रात्री दृष्टांत दिला की “तुझ्या घरी आम्ही चालून आलो असता भोजन दिले नाहीस, आता तुझा भोग संपत आला आहे.यापुढे वाडीस पुन्हा येवू नको.म्हैसाळास जावून श्रीकृष्ण स्वामीस आपल्या घरी घेवून जा व द्वैतभाव सोडून भक्तीने त्यांची सेवा कर. मीच तो आहे” असे स्वप्न पडताच ती जागी झाली. मनोमन स्वप्नाचे कौतुक करीत दुसरे दिवशी कोल्हापूरास परत आली. घोडागाडी घेवून म्हैसाळास श्रीकृष्ण स्वामींना आणणेस गेली.श्रीकृष्ण स्वामींना पाहून तिचे अंत:करण भरून आले. झाल्या अपराधाची क्षमा मागून ती सभावे उभी राहिली. तिचा शुध्द भाव जाणून श्रीकृष्ण स्वामी तिच्या बरोबर जाणेस सिध्द झाले. हे पाहून म्हैसाळकरांना खूप दु:ख झाले. तथापि, करवीरास ताराबाईचे घरी दर्शन होईल असे सांगून स्वामी म्हैसाळहून करवीरास ताराबाई समवेत आले. ताराबाईने श्रीकृष्ण स्वामींना घरी आणून पलंगावर बसवून नाना प्रकारची पक्वान्ने तयार करून श्रध्देने घातली. त्या दिवसापासून ताराबाईने श्रीकृष्ण स्वामींना आपले उपास्य दैवत, आपला देव समजून आपले राहिलेले आयुष्य खर्ची घातले.
५) ताराबाईची आई भीमाबाई .श्रीकृष्ण सरस्वती महाराजांनी भीमाबाईना चोरीचा आळापासून वाचवले.
तारामतीची वृध्द माता भीमाबाई स्वामींना एक खुळा भ्रमिष्ट असेच समजत आली होती.तारामतींनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न कित्येक वेळा केला होता,पण ते सर्व व्यर्थ गेले होते. असेच एका दिवशी सणावाराच्या महत्वाच्या प्रसंगी महाराजांच्या दर्शनार्थीचा बराच मोठा जमाव जमला होता.त्यातील एका भक्ताचे सुवर्णाचे कडे कोणीतरी चोरले.लागलीच बोभाट झाला आळ मात्र वृध्द भीमाबाईवर आला.तारामतींची तर तारांबळ उडाली. त्यांनी बाहेर कुणालाही न सोडण्याचा प्रबंध रचला. चोर तपासासाठी राज नोकर तेथे पाचारण करण्यात आले तो पर्यंत अनेक भक्तांनी वृध्द भीमाबाईची एवढी वाक पूजा केली की तिला कळून चुकले की आपण ह्या साक्षात दत्तगुरू सारख्या पूज्य समर्थ महा पुरुषांची निंदा करीत आले. म्हणूनच आपल्या मागे हे नसते बालंट लागले आहे. तिने मनोमनी श्री गुरुंची विनम्र भावे क्षमा याचिली तर परिपूर्ण शरणांगत झालेली पाहून ह्या अंतरसाक्षी सद्गुरुंनी मग ते संकट निवारले.राज नोकरांना तो खरा चोर सापडला त्या वेळे पासून भीमाबाई महाराजांना पूज्य मानू लागली. पण तिच्या देह स्वभावाने तिला परिपूर्ण सोडलेच नव्हते. जेवणानंतर दुपारच्या वेळी भीमाबाई आपल्या सख्यासह सारीपाठ खेळत असे.
एक दिवशी असाच त्यांचा सारीपाठ खेळ चालला असतांना महाराज तेथे येऊन म्हणाले.
“अविचारे तेथे पडता फासा I
नरक यातना न चुके सहासा I
आधी पासून जागृत असा I
प्रमाद वळसा पडेल II७०I
मूळ सोडूनी बाहेर येता I
नरक भोगी भिन्नावस्था I
मध्येच काळमुखी पडता I
जन्म मागुता चुकेना II७१II
विचार करुनी टाका डाव I
नातर होईल धावां धावां |
चुकेल विश्रांतीचा ठाव I
अंती उपाय न सुचे मग II७२II
(प्रथम चरित्र अध्याय ६)
असे म्हणून महाराजांनी त्यांच्या खेळातील एक सोंगटी उचलली. तेंव्हा भीमाबाई एकदम संतापल्या घडीभर जरा खेळावे म्हटले तर हा अवचीत येवून त्रास देतो आता ह्याला शयनागरी घालून येते. थांबा तो पर्यंत असे तिने सख्याना सांगत महाराजांचा एक हात पकडून फरफटत न्यावे तसे शेजघरात आणून आता “झोप पलंगावर !” असे म्हणून बाहेर येऊन दारास कडी लावून टाकली. आता तेथून तारामती निघाल्या, औदुंबर वृक्षावरून कांहीसा आवाज आला म्हणून त्यांनी वरती पाहिले तो महाराज आवडीचा पर्ण खेळ करीत होते. महाराज झाडावर एकटे कसे ? ह्या विचारातच ताराबाईंनी आपला मोर्चा भीमाबाईकडे वळविला.महाराज कुठे आहेत गं ?असा सवाल काळजीयुक्त अविर्भावात विचारताच “काय गं एवढी घाबरतेस ?मी त्यांना खेळण्यात त्रास देत होते म्हणून शेज घरात कोंडून ठेवलाय,चल तुला दाखवते, शेज घरात ते झोपले असणार ! ताराबाई पण म्हणाल्या “चल, चल ! दाखव मला !” भीमाबाईंनी कडी काढून दार उघडे करून पाहतात ते महाराज कुठे दिसेनात त्या छोटयाशा चार भिंतीच्या दगडमातीच्या खोलीत ते परब्रम्ह कुठे कोंडून राहणार ? महाराज नाही म्हटल्याबरोबर भीमाबाईंची बोबडी वळली आणि चक्कर येऊन जमिनीवर कोसळली तेही महाराजांचे नाव घेत ! मिस्किलपणे तारामतींनी हसतच महाराजांचे तीर्थ तिजवर शिंपडून सावध करीत म्हटले “कुठे आहेत गं महाराज !” भीमाबाई त्यांना म्हणाली “मी नष्ट पापीण ! या खोलीत तर त्यांना मीच कोंडले होते. बाहेरून कडी तर मीच लावली होती बाहेर पळून जाण्यास कोणताही मार्ग पण नाही. मग महाराज कसे नाहीसे झाले ते मला कांही कळत नाही. ह्या चिंतामणीला न जाणणारी मी तारे ! ह्या माझ्या अपराधाला विसरून जा !”तारामती मग तिला म्हणाल्या “माते ! अगं तू आता मरायला टेकलीस आता तरी मूढपणा सोड आणि ह्या दतावताराला शरण जा ! हा कांही सामान्य नर नव्हे ! आपल्यासाठी आलेला हा साक्षात भव तारून नेणारा सद्गुरू श्री कृष्ण सरस्वती महाराज आहे ! चल तुला दाखविते त्यांचा साक्षात्कार ज्यांना तु कडी कुलूपात कोंडले होतीस ना ! तो सद्गुरुराणा ! बघ तो औदुंबराच्या फांदीवर !” मग तारामती महाराजांना म्हणाल्या, “महाराज माझ्या मूर्ख मातेने तुम्हाला शेजघरात कोंडले, देवा आम्हांला क्षमा करा आणि खाली उतरून चरण दर्शन द्या”.नेत्रपूर्ण अश्रूंनी तारामतींनी प्रार्थना केली. त्या करूणाघनाने पण तारामतींच्यावर करुणेचा वर्षाव केला.तारामतीच्या शब्दावर महाराज औदुंबरावरून खाली उतरले.तारामती सह सर्वांनी महाराजांचे विनम्रपणे दर्शन घेतले. थोडयाच दिवसांनी ताप आल्याचे निमित्त होऊन भीमाबाई निधन पावली. तारामतींना अतीव दु:ख झाले.कालांतराने त्यांना माउलीच्या विरहाचे दु:ख श्री गुरुमाऊलींच्या सेवेपायी विसरणे भाग पडले.
६)ताराबाई शिर्के यांनी त्यांच्या सुनास आपण स्वतःमहानैवेद्य करून श्रीकृष्ण सरस्वती यांना भरवावे व त्यांची सेवा करावी असा उपदेश केला.महाराज भक्तांच्या गळ्यातील ताईत बनले.
ताराबाईंच्या मुलाचे नाव दत्तोबा. तो मातृभक्त होता. ताराईचा प्रत्येक शब्द मानी, घरचा व्यवहार चालवी. माय-लेकरे श्रीस्वामी सेवेत सुख मानून होते. दत्तोबाच्या पतीचे नाव लक्ष्मीबाई होते. तीहि स्वामीभक्त होती. महिन्याकाठी स्वयंपाकाला चार दिवस हातभार लागत नसे याची हुरहूर लक्ष्मीच्या मनाला लागे. पाचव्या दिवशी ताराई लक्ष्मीला म्हणे “लक्ष्मी लवकर ऊठ आंबेमोहर तांदळाची खिचडी कर. काकड आरती होताच ती मी श्रीस्वामींना भरवीन”. काकड आरती होताच ताराई श्रीस्वामींना खिचडी भरवी. खिचडी खावून श्रीस्वामी तृप्त होवून ढेकर देवून म्हणत “आज पोट भरले”. “स्वत: स्वयंपाक करून श्रीस्वामींना नैवेद्य अर्पण केल्याने श्रीस्वामी प्रसन्न असतात / राहतात”. असे ताराई लक्ष्मीला म्हणत असे. तेंव्हापासून आजपर्यंत स्वत: स्वयंपाक करून श्रीस्वामींना नैवद्य अर्पण केल्याने, श्रीस्वामी सेवा करीत राहिल्याने श्रीस्वामींची कृपा शिर्के घराण्यावर आहे / राहणार आहे, कारण श्री शिर्के घराणे हे ताराईंच्या वचनास जागत आहे.भवतापांचे शमन होवून शांतीसुखाचा लाभ व्हावा म्हणून शेकडो लोक श्रीकृष्ण स्वामींच्या दर्शनास व आरतीस जमू लागले.कित्येक लोकांची पिशाच्चबाधा दूर झाली तर अनेकांची संकटे दूर झाली. सर्व लोक श्रद्धेने / भक्तिने स्वामींना भजू लागले.श्रीकृष्ण स्वामी परब्रम्हस्वरूप सर्वज्ञ व नेहमी आत्मरुपात रमणारे, भक्तांवर कृपा करणारे लोकांना वाटू लागले. ते नेहमी हसतमुख, प्रसन्नमुख, शांतवृतीत रममाण होत.ते अंगाने ठेंगणे व कांतीने तेज:पुंज होते. भावनिक / कामनिक लोकांची गर्दी त्यांच्या भोवती जमू लागली.परंतु निष्काम भक्ति करून पारमार्थिक कल्याण फारच थोडया लोकांनी साधले.मनुष्यरूपाने प्रकट होवून दूरदूरच्या भक्तांची संकटे ते दूर करीत. श्रद्धापूर्वक शरण गेल्यास त्यांच्या मनातील आशयाचे/प्रश्नांचे उत्तरे देत, त्यांचे मन ओळखत.तथापि जग विविध आहे. कांही श्रीकृष्णस्वामींना मदांधपणे पीडा देत, त्रास देत.कोणी त्यांना वेडा म्हणत तर कोणी त्यांची निंदा करीत. परंतु सदैव ते आत्मस्वरूपी रममाण असत.संताना, सत्पुरुषांना अशा पाखंडी त्रासाला सामोरे जावे लागते.मगच देवपण खुलून दिसते.श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज,एकनाथ महाराज, रामदास स्वामी इत्यादी या लोकांच्या कसोटीला, त्रासाला सामोरी गेल्याचे दिसून येते.ताराबाईचा मुलगा दत्तोबा सदाचारी असून,तोही ताराबाईच्या आज्ञेत वागून श्रीकृष्ण स्वामी सेवेत रममाण झाला.ताराबाईने आपले तन, मन, धन श्रीकृष्णस्वामींना अर्पण केले व त्यांच्या सेवेत रात्रंदिवस निमग्न झाली.
(७)ताराई व श्रीकृष्ण सरस्वती महाराजांची झालेली पहिली भेट व श्रीपाद श्रीवल्लभ यांनी ताराई यांना दिलेला दृष्टांत.
श्री स्वामी प्रेषित कोड / कुष्टाने त्रस्त झालेल्या सेवकास महाराजांनी व्याधी मुक्त केल्यावर फडणवीसांचे घरी कांही काळ वास्तव्य केले होते, तेथून श्री महिसाळकर ह्या प्रिय भक्ता समवेत महाराज कुंभार गल्लीत “हे आमचे घर” म्हणून तारामती शिर्केंच्या दारी भिक्षेसाठी थांबले.आपल्या पूर्व परंपरागत अनुसयात्मज त्रयमूर्ती दत्तात्रेयांच्या दिन चर्येच्या नियमानुसार म्हणजे भर दुपारी माध्यान्ह समयास ओम भिक्षा देही !म्हणून तारामती शिर्केंच्या श्रद्धाळू अंत:करणास साद घातली. ह्या बटू भिक्षूकाला सिद्धान्न कसे वाढायचे म्हणून त्यांनी “कोरडी भिक्षा आणून देते,आपण ते आदेश करून जेवावे !” असे म्हणून त्या आत जाऊ लागल्या तेंव्हा महाराज तशाही स्थितीत ताराबाईंच्यावर स्मित कृपा टाकून त्या भिक्षेचा अव्हेर करीत “चल तुझ्या घरी !” असे श्री महिसाळकरना म्हणत महिसाळ ग्रामी निघून गेले !
त्यावेळची ती समाज रूढीची ती कल्पना द्विज भिक्षूकास सिधान्न (जेवण) ब्राम्हणानीच घालावे. आपल्या सारख्याने घालणे उचित नव्हे.ह्या वेडया कल्पनेतून महाराज तारामतींना जागे करू पाहत होते. तेवढयासाठीच त्यांनी तारामतींच्यावर स्मित कृपा कटाक्ष टाकला होता.महाराज अबोलपणे निघून गेले. “त्याग” म्हटला तर मंदस्मित करत निघून गेले, ह्या घटनेमुळे तारामतीच्या राहून राहून मनाला चुकल्या सारखे वाटत होते. अवाक झालेली त्यांची मनस्थिती घडलेल्या कोणत्या ना कोणत्या तरी अपराधाची कारण मीमांसा शोधून काढण्यात थकून गेली. नित्य नेमाची नृसिंहवाडीची वारी पोटशुळाच्या त्रस्त तनु मनाच्या दहाने नियम भंग होऊ नये म्हणून कशीतरी पार पडली. तेथे यथाशक्ती नेहमी प्रमाणे दिन अनाथास भोजन घातले. त्याच रात्री त्यांना श्री गुरुंचा स्वप्न दृष्टात झाला !जटाजूट त्रिशूळधारी श्रीपाद श्रीवल्लभ रुपात महाराज तारामतींना म्हणाले “तुला इकडे येण्यासाठी होणा-या देहयातना चुकव्यात म्हणून मीच तुझ्या घरी येतो असे तुला सांगितले होते व त्या प्रमाणे मी तुझ्या दारी भिक्षेसाठी उभा राहिलो होतो. पण तू मला विन्मुख पाठविलेस ! तुझ्या दारी आलेला श्री कृष्ण बटू मीच आहे. जा महिसाळ ग्रामी आणि उदंड सेवा कर आणून घरात त्यांची ! ”श्रीपाद श्रीवल्लभ रूपातील ते अमृतोदगार ऐकताच तारामतींचा आनंद गगनात मावेना त्या दत्त राजाला विनम्र अभिवादन करीत श्री कृष्ण सरस्वती महाराजांचा शोध घेत महिसाळ ग्रामी गेल्या. महिसाळकरांचे गृही तारामती श्री गुरुंना शरणांगत दंडवत घालून म्हणाल्या.
घरी आलासी चालून I परी अबला मी हीन दीन l
नाही ओळखीले ऐसे निधान I करुणाघन श्री गुरु II४५II
अन्याय पोटी घालूनिया I आता चलावे श्री गुरुराया I
परात्पर कृष्ण चिन्मया I कृतार्थकाया करी मम II ४६ I|
महाराजांनी पण तारामतींच्या विनंती आग्रहाला मान दिला, आणि त्यांच्या हाताला धरून “चल ! चल ! चल ! अश्वयान तयार कर !” असे महाराज तारामतीला म्हणाले.म्हैसाळकरांना मात्र त्यामुळे फार दु:ख झाले. म्हैसाळकरांनी तो पर्यंत महाराजांची मनोभावे अखंड सेवा सुश्रुषा विनम्रपणे केली होती. अखिल विश्वाला तेजस्वी करणा-या ह्या दत्त मार्तंडाची अवतारोदयाची ती प्रात: पूजा अत्यंत पूज्य भावनेने केली होती.त्यांनी वाहिलेल्या भक्ति प्रेमाजुंळीच्या अर्ध्यावर हा प्रताप भानू दत्तात्रेयही सुप्रसन्न झाला होता.