अध्याय ९ वा श्रीकृष्ण सरस्वती महाराजांनी जोतिबाला जाऊन श्री ज्योतिर्लिंग यांचे दर्शन घेतले.

 

लेखक : श्री. बजरंग झेंडे

चरित्र : समुद्र भरला आहे

संदर्भ : कै. बाळासाहेब रामनाथ शिर्के लिखित श्री कृष्ण सरस्वती चरित्र

(महानैवेद्य सेवा ग्रुप,कोल्हापूर)

१) श्रीकृष्ण सरस्वती महाराजांनी जोतिबाला जाऊन श्री ज्योतिर्लिंग यांचे दर्शन घेतले.

एकदा स्वामी भक्तांना म्हणाले “श्री ज्योतिर्लिंगाला दर्शनाला जावू या, दक्षिण केदारला वाडी रत्नागिरीला जावू या”.हे ऐकून भक्त बाळकू राशिवडेकर समोर येऊन म्हणाला “चला बसा माझ्या खांद्यावर क्षणात त्वरित श्री जोतिबा दर्शनाला जावू या” यावर ताराबाई स्वामींना म्हणाली “सर्व भक्तांनाही श्री जोतिबा दर्शनाला न्या व लवकर परत या मला जीवाला हुरहुर लागते” अशा रीतीने बाळकूच्या खांदयावर स्वामींना बसवून सर्व भक्तमंडळी वाडी रत्नागिरी म्हणजेच श्री जोतिबा दर्शनासाठी डोंगराकडे निघाली. चालत चालत सर्व मंडळी रामभाऊ फारिकाच्या घरा जवळ माध्यान्ह काळी आली. रामभाऊ फारिकाने असा विचार केला की, स्वामींना रस्त्यात / प्रवासात भूक लागली तर लाडू / मोदक असे फराळाचे जिन्नस तर घरातून बांधून घ्यावेत. फारिकाचा विचार समजून स्वामी त्याला म्हणाले “लाडू, मोदक फराळाचे जिन्नस बरोबर घेवून भूक टाळण्यासाठी, भूक शमविण्याची कांही गरज नाही. प्रवासातील तहान भुकेची मी व्यवस्था केली आहे. याची प्रवासात प्रचिती येईल” हे ऐकून फारिकाने लाडू / मोदक फराळाचे जिन्नस न घेता स्वामींच्या बरोबर सर्वजण भराभर जोतिबा डोंगराकडे वाटचाल करू लागले. रस्त्यातील वडणगे गांवा पर्यंत पोहचे पर्यंत सर्वजण घामाने भिजून निघाले, उन्हाने घामाघूम झाले. हे पाहून दयाळू स्वामी सूर्याकडे पाहून म्हणाले “अंबेच्या मंदिरात आम्ही विश्रांती घेणार आहे. अंबेचे मंदिरही अजून दूर आहे. तेंव्हा उन्हाचा त्रास आम्हाला होऊ नये. शीतल / शांत हो “स्वामींच्या या बोलानंतर भराभर ढग जमू लागले. ढगांनी सूर्याला व्यापून टाकले. सगळीकडे सावली पसरली. उन्हाची तीव्रता कमी झाली. अशा रीतीने सर्वांना स्वामींचे सूर्य / चंद्रा वरील सत्तेचे मोल पटले.सर्वजण आनंदाने भर दोन प्रहरी वडणगेच्या अंबेच्या मंदिरात पोहचले. थोडीफार विश्रांती घेवून पुन्हा स्वामी भक्तासह जोतिबा डोंगराकडे जाऊ लागले / प्रवास करू लागले. भर दुपार झाल्याने उन्हामुळे स्वामींना फार तहान लागली. एवढ्यात एक शेतकरी भेटला त्या शेतकऱ्याकडून रामभाऊने पाणी आणणेसाठी भांडे मागून घेतले. स्वामींना पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी रामजी विहिरीचा शोध घेऊ लागला. तेवढ्यात एका शेतात विहिरीजवळ एक ब्राम्हण फराळ / जेवण घेत असतांना दिसला. भर दुपारची वेळ रामजीने त्या ब्राम्हणाला आपल्या स्वामींना लागलेली तहान / प्रवास या विषयी हकीकत सांगितली. यावर त्या ब्राम्हणाने रामजी जवळ सर्वांना पुरतेल एवढे लाडू खाण्यासाठी दिले व विनयाने म्हणाला “माझे लाडू मी तुमच्या गुरुसाठी व तुम्हांसाठी खाण्यासाठी देत आहे. ते सर्वांनी खावेत लाडू खाऊन तुमचे गुरुही तृप्त होतील. माझे लाडू यामुळे सत्कारणी लागतील”. रामजीने त्या ब्राम्हणाने दिलेले लाडू व पाणी घेवून आला. स्वामींनी व सर्व भक्तांनी त्या लाडवाचा आस्वाद घेतला, पाणी प्याले. सर्वांची भूक शांत झाली. अशा प्रकारे स्वामींनी रामजीला घरातून लाडू / मोदक असे फराळाचे जिन्नस घेवू नको म्हटले होते याची प्रवासात सर्वांना प्रचिती आली. आपला स्वामीवरील अविश्वास अयोग्य आहे असे रामजीस वाटू लागले. आपण अल्पमती आहोत असे वाटू लागले. जोतिबा डोंगराकडे जात असतांना पेरूची झाडे लागली. झाडावरील पेरू खात, स्वामींच्या नांवाचा जय जयकार करीत सर्वजण जोतिबा डोंगरावर पोहोचले. श्री जोतिबा मंदिरात पोहोचले. श्री जोतिबाला / केदारनाथाला नमस्कार करून स्वामी केदारनाथाची स्तुती गावून म्हणू लागले. “करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मदतीला तू धावून आलास लढाईत रत्नासुराला तू मारलेस, आई अंबाबाईला विजय मिळवून दिलास, तिच्यावर उपकार केलास. परंतु तिने तुला स्थानापन्न होणेस बसणेस परवानगी / अनुमती दिली नाही काय ? युगे अठ्ठावीस पांडुरंग विटेवर उभा आहे तसा तुही उभा आहेस काय ? आई अंबाबाई निष्ठुर आहे काय ? तुझे दर्शन घेवून गुलाल उधळणाऱ्या भक्तांना तू त्वरित पावतोस. आता आम्हांला तुझे दर्शन झाले आहे. परत करवीर / कोल्हापूरला जाण्याची आज्ञा दे” असे म्हणून स्वामी सोबतच्या भक्तांना म्हणाले “चला लवकर परत. ताराबाईला उपवास पडेल. माझ्याशिवाय ती अन्न ग्रहण करणार नाही. जेवणार नाही”. अशा रीतीने श्री जोतिबाचे दर्शन घेवून / सर्व मंडळी स्वामीसह रात्री ताराबाईच्या घरी बाळकूच्या खांद्यावर बसून परत आली. आल्यानंतर सर्व मंडळींनी स्वामींची शेजारती केली. अशा प्रकारे श्री जोतिबा डोंगराची / श्री केदारनाथ दर्शनाची यात्रा पूर्ण झाली.

२) कपटी सावकार श्रीकृष्ण सरस्वती महाराजांना शरण आला.

कोल्हापूरच्या शेजारी एका खेडेगांवात दोन भाऊ आनंदाने रहात होते. त्या गावातील एक कपटी सावकाराने त्या दोन भावात वाटणी वरून वितुष्ट / वाईटपणा आणला. त्या सावकाराच्या कपटीपणाला धाकटा भाऊ बळी पडला व त्याने थोरल्या भावाला घरातून हाकलून दिले. घरातून हाकलून दिल्यानंतर तो थोरला भाऊ कोल्हापूरला निराश होऊन परागंदा होऊन आला व आई अंबाबाईच्या देवळात राहू लागला.श्री अंबाबाईच्या देवळात स्वामींची कीर्ती त्या थोरल्या भावाच्या कानावर पडली व तात्काळ तो स्वामींच्या दर्शनाला ताराबाईच्या घरी आला. श्री स्वामींचे दर्शन घेवून तो स्वामींना म्हणाला “कपटी सावकाराचे ऐकून धाकट्या भावाने मला घरातून हाकलून दिले आहे. माझी पत्नीही मला सोडून गेली आहे. मी आता जगात एकटाच राहिलो आहे. श्री अंबाबाईच्या देवळात तुमची कीर्ती ऐकून तुमच्या दर्शनासाठी आलो आहे. मला या सर्व संकटातून सोडवा. मार्ग दाखवा. तुमच्या पायाजवळ थारा द्या. तुमच्याशिवाय या जगात माझा कोणी वाली नाही”. हे ऐकून स्वामी त्याला म्हणाले “तुला आसरा दिला आहे. इथं रहा, रोज पंचगंगेतून पाण्याच्या घागरी भरून आणीत जा. तुझ्या पोटा पाण्याची सोय इथं केलेली आहे, ताराबाईच्या घरी केलेली आहे”.अशा प्रकारे स्वामींची सेवा करता करता सहा महिने गेले. एक दिवस त्या मनुष्याचा धाकटा भाऊ शोध घेत घेत ताराबाईच्या घरी आला व त्या थोरल्या भावास म्हणू लागला “त्या कपटी सावकाराने आपल्या दोघात वाटणीवरून वितुष्ट आणले. मीही त्याचे ऐकले.कपटीपणा मुळे सावकाराची तरणीताठी बायको वारली. त्याचा त्यालाही पश्चाताप झाला आहे. मीही माझ्या बायकोचे ऐकून तुझ्याशी दुष्टपणाने वागलो आहे. आता घरी परत चल. घर व  जमीन तुला समान वाटून देतो” ते ऐकून तो थोरला भाऊ त्याच्या धाकटया भावास म्हणाला “तुला तुझा संसार बायको प्रिय. तू तिचे ऐकून संकटात मला ढकललेस. मला आता घरदार / शेती काहीही नको. तुला लखलाभ होवो, “ते ऐकून धाकटा भाऊ थोरल्या भावास म्हणाला “मला माझ्या अपराधाची क्षमा कर. तुझ्या स्वामीजवळ जाऊया ते काय म्हणतात ते तर पाहू या”.यावर दोघे भाऊ स्वामीजवळ आले व दर्शन घेवून उभे राहिले. यावर स्वामी थोरल्या भावास म्हणाले “ धाकटया भावाचे ऐक त्याच्या बरोबर परत घरी जा. त्या सावकाराला क्षमा कर, भावाला क्षमा कर. आनंदाने भाऊ भाऊ एकत्रित रहा. सुखाने संसार कर. धाकटया भावाचे मन मोडू नकोस”. मग स्वामींचे ऐकून तो थोरला भाऊ धाकटया भावाबरोबर परत घरी गेला. तो कपटी सावकारही त्यांच्या घरी येवून त्याने आपल्या कुकर्माची क्षमा थोरल्या भावाजवळ मागितली. अशा रीतीने त्या थोरल्या भावाने रोज पंचगंगेतून पाण्याच्या घागरी भरून आणण्यासाठी सेवा केली. स्वामी कृपेने त्याचे घर, त्याचा संसार पुन्हा सजला. जो मनुष्य स्वामीसेवेत आयुष्य घालवितो त्याला या जगात कसलेही दु:ख राहत नाही. जगात त्याला काहींही दुर्मिळ असत नाही.

३) श्री हरिपंत शिद्नेर्लीकर यांना श्री कृष्ण सरस्वती महाराजांनी मांजर रुपात दर्शन दिले.

कोल्हापूर जवळ कागल हे तालुक्याचे गांव आहे. या गांवात हरिपंत शिद्नेर्लीकर नांवाचे गृहस्थ रहात होते. राजदरबारात ते नोकरी करीत असल्याने त्यांची आर्थिक स्थिती बरी / चांगली होती. वरचेवर कामानिमित्त हरिपंत शिद्नेर्लीकर कोल्हापूरला कामानिमित्त येत असत. कोल्हापूरात येत असल्याने वरचेवर स्वामींची ख्याती / स्वामींचे दिव्य जीवन त्यांच्या कानावर पडत होते. सुकृतामुळे हरिपंत शिदनेर्लीकर यांना स्वामी दर्शनाची जबरदस्त ओढ लागली. या  दर्शनाच्या ओढीने ते एकदा स्वामी दर्शनाला कोल्हापूरला ताराबाईच्या घरी गेले. स्वामी दर्शनाने त्यांचे पूर्व सुकृत फळाला आहे. त्यांची वृत्ती पालटली, अंतरंग बदलून गेले व रोज स्वामींच्या दर्शनाला येवू लागले. लवकरच हरिपंत शिदनेर्लीकर यांनी राजदरबारातील मानाची नोकरी सोडली व स्वामी सेवाधर्म मानला व स्वामींच्या सेवेत जीवन व्यतित करू लागले. पहाटे लवकर उठून स्नान संध्या आटोपून ते घरा शेजारच्या श्री खंडोबा मंदिरात अनुष्ठान करीत. अनुष्ठान संपल्यानंतर ते पुन्हा स्वामी दर्शनाला येत व स्वामी सेवेत दिवस घालवीत. हा त्यांचा नित्यक्रमच होता. एकदा काय झाले ज्या श्री खंडोबा मंदिरात हरिपंत अनुष्ठानाला बसत / वाचनाला बसत त्या मंदिराला उजेडवारा येण्यासाठी एकच खिडकी होती. त्या खिडकीत एक मांजर रोज येऊन बसू लागले. त्यामुळे वाचनाला पुरेसा प्रकाश येईना म्हणून हरिपंताने रागाने त्या मांजराच्या तोंडाला मारले. पुढे अनुष्ठान / वाचन पूर्ण होताच हरिपंत स्वामी दर्शनाला मठीत गेला. तेंव्हा स्वामींनी मांजर रूपाने हरिपंताच्या अनुष्ठानाला गेलो असता खिडकीत बसून वाचन ऐकत असतांना हरीपंताने मला गालावर मारले. हा पहा माझा गाल माराने लाल झाला आहे म्हणून हरीपंताना व जवळ असलेल्या भक्तांना दाखविला. स्वामींचा लाल झालेला गाल आपल्या माराने झालेला पाहून तो ओशाळला व त्यांच्या मनाला वाटले. प्रत्यक्ष भगवंत / अनुष्ठानाला / अनुष्ठान पाहायला आला असतांना त्यांनाच मी थप्पड मारण्याचा मूर्खपणा केला. पश्चातापाने हरिपंताचे मन होरपळले. स्वामी केवळ मनुष्यरूपातच नाहीत तर पशुपक्षांचे अवतार धारण करणारे प्रत्यक्ष भगवंताचे / श्री दत्तात्रयाचे अवतारच आहेत अशी त्यांनी खूणगाठच बांधली.

४) द्रविड ब्राम्हणच्या मनातील विचार श्रीकृष्ण सरस्वती यांनी ओळखला.

एकदा स्वामी आपल्या भक्तांना म्हणाले “पंचगंगा नदीकाठी असलेल्या सिद्धनाथाचे दर्शन घेवू या. परत येतांना वाटेत तुम्हा मौज दाखवू या” श्री सिद्धनाथाचे दर्शन घेवून परत येतांना एक द्रविड देशाचा ब्राम्हण पंचगंगेत स्नान करून सोवळ्याने मंत्र पठण करीत चाललेला भक्तांनी पाहिला. स्वामींचे अलौकिक तेज पाहून तो द्रविडी ब्राम्हण स्तंभित झाला व थबकला. भाषेची अडचण असल्याने हातवारे करून स्वामींची चौकशी केली हे महामुनी कुठले असाही प्रश्न हातवारे करून केला. भक्तांनी श्री स्वामीजी हे प्रत्यक्ष दत्त अवतार असल्याचे सांगताच जरी सोवळे असले तरी स्वामींचे दर्शन घेवू या, फार तर पुन्हा एकदा स्नान करावे लागेल असा विचार त्या द्रविडी ब्राम्हणाच्या मनात आला. स्वामींनी त्या द्रविडी ब्राम्हणाच्या मनातील विचाराचा गोंधळ ओळखला व त्याला म्हणाले “माझ्या दर्शनाने, माझ्या स्पर्श दर्शनाने तुझे सोवळे बिघडणार नाही घे दर्शन” स्वामींचे हे अंतरसाक्षित्वाचे बोल ऐकून त्या द्रविडी ब्राम्हणाला आपल्या मनांतील सोवळ्या ओवळ्याचा गोंधळ स्वामींनी कसा ओळखला याचे आश्चर्य वाटले. खरोखरीच स्वामीजी श्री दतात्रयाचे अवतार आहेत असे त्या द्रविडी ब्राम्हणाला पटले व त्यांनी स्वामीजींचे स्पर्श दर्शन घेवून त्यांची अलौकित्वाची स्तुती गायली.