Admin
11/15/2021 12:01:34 AM
लेखक : श्री. बजरंग झेंडे
चरित्र : समुद्र भरला आहे
संदर्भ : कै. बाळासाहेब रामनाथ शिर्के लिखित श्री कृष्ण सरस्वती चरित्र
(महानैवेद्य सेवा ग्रुप,कोल्हापूर)
१)सद्गुरू श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज यांचे बालपण व श्री खंडेरायांच्या दर्शनाला मंगसुळीला प्रयाण आणि प्रत्येक्ष श्री शिवशंकर व पार्वती यांनी महाराजांना दर्शन दिले व श्री स्वामी समर्थाना गुरू करून घेण्याची आज्ञा दिली
बघता बघता श्रीकृष्ण सात वर्षांचा झाला. सवंगडयाना गोळा करून खेळू लागला. उंच दगडावर बसावे, तेच सिंहासान म्हणावे कोणी भुखेने व्याकुळ असेल त्यास अन्न द्यावे, थंडीने कुडकुडत असेल त्यास वस्त्र द्यावे. साधुवृतीने वागावे. सवंगड्याना म्हणावे. “तुमची दु:खे / संकटे मी दूर करतो” याप्रमाणे कारणिक सत्पुरुषा प्रमाणे वागावे. श्रीकृष्णाचे हे वागणे बघून सवंगडी त्याला वेडा म्हणत, हसत, त्रास देत. गांवचे लोक त्यास वेडपिसा म्हणू लागले, अपशब्द बोलून निंदा करू लागले. हे पाहून आप्पाभट व अन्नपूर्णाबाईंना खूप दु:ख होई, मनस्ताप होई. परंतु श्रीकृष्ण नेहमी शांत, आनंदी, प्रसन्न असे.
उपनयन / मौजीबंधन केल्यानंतर श्रीकृष्णाच्या वागण्यात / बोलण्यात बदल होईल, सुधारणा होईल म्हणून वयाच्या आठव्या वर्षी आप्पाभटजींनी त्यांचे मौजीबंधन केले. गायत्री मंत्राचा उच्चार व्यवस्थित करता येत नाही म्हणून पुरोहिताने श्रीकृष्णास जडमती म्हणून वेदपठनास अयोग्य संबोधले. कांही दिवस गेल्यावर एके दिवशी श्रीकृष्ण मातेजवळ गेला व म्हणाला “माते आपला कुलस्वामी खंडोबा आहे. त्याच्या दर्शनाला मंगसुळीला जाण्याची परवानगी दे” मुलाचे हे भाषण ऐकून अन्नपूर्णाबाई चकीतही झाल्या व चिंताग्रस्तही झाल्या.त्या श्रीकृष्णास म्हणाल्या “माझ्या लाडक्या बाळा, तू घर सोडून गेल्यास घर मला ओस वाटून चैन पडणार नाही. त्यातून तू लहान वयाचा कोमल बालक आहेस. वाट चुकल्यास तुला कष्ट फार होतील. म्हणून मंगसुळीला खंडेरायाच्या दर्शनाला जाण्याचा बेत तूर्त तू सोडून दे” मायलेकराचे बोलणे चालू असताना तेथे अचानक आप्पाभटजी आले व अन्नपूर्णाबाईंना विचारू लागले “कृष्णा आज काय बोलतोय?” अन्नपूर्णाबाईंनी श्रीकृष्णाचे मनोगत आप्पाभटजींना सांगितले. त्यावर आप्पाभटजी म्हणाले“श्रीकृष्णाच्या इच्छेआड येऊ नकोस प्राक्तन देवादिकांना सुटत नाही. प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या पोटी आला आहे त्याला मंगसुळीला जाण्याची परवानगी दे.”दुसऱ्या दिवशी आई-वडिलांना वंदन करून श्रीकृष्ण श्री खंडेरायाच्या दर्शनासाठी मंगसुळीची वाट चालू लागले. उन्ह तापत होते. दोनप्रहरची वेळ बेडग गांवातून जातांना एक मोठी विहीर पाहून तिच्या काठावर शिदोरी ठेवून श्रीकृष्ण स्नानासाठी विहिरीत उतरले. इतक्यात एका कुत्र्याने त्यांची शिदोरी पळवून नेली.स्नान करून श्रीकृष्ण वर काठावर आले. त्यावेळी गांवातील कोणी एक स्त्री पाणी भरण्यासाठी आलेली त्यांनी पाहिले व म्हणाले “मातोश्री, माझ्या आईने मला वाटेत भूख लागेल म्हणून फराळाचे जिन्नस बांधून दिलेली शिदोरी तू कां घेवून गेलीस? तुलाही मुले बाळे असतील. मला फार भूख लागली आहे.” श्रीकृष्णाचे हे मंजुळ बोल ऐकून तिला मोठे कौतुक वाटले व ती म्हणाली “तू कांही काळजी करू नकोस. मी तुझी भूख शांत करीन. तू माझ्याबरोबर घरी चल. असे बोलून श्रीकृष्णास घेवून ती घरी गेली. दही व भात कालवून खाण्यासाठी श्रीकृष्णा समोर ठेवला. परंतु श्रीकृष्णांनी तो खाल्ला नाही. मग त्या स्त्रीने श्रीकृष्णास घास भरविला.दही भात भक्षण करून तृप्त होऊन “तुला मुलगा होईल” असा आशिर्वाद देवून श्रीकृष्ण पुढे जाण्यास निघाले. हे ऐकून ती स्त्री आश्चर्यचकित झाली व हे मूल कोणी तरी सत्पुरुष असावे असे तिला वाटले व म्हणू लागली “माझे पती बाहेर गेले आहेत, ते येई पर्यंत येथे वास्तव्य कर. ते आल्यानंतर मी तुला पक्वानाचे भोजन देईन मग पुढे निघ” तिच्या विनंतीकडे लक्ष न देता श्रीकृष्ण म्हणाले “मला मंगसुळीला देव दर्शनाला जाण्याची घाई आहे. राहणेचा विनाकारण आग्रह करू नकोस” श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून त्या स्त्रीला फार दू:ख झाले. श्रीकृष्णाला बरोबर कांही खाण्याचे पदार्थ दिले व आपल्यावर कृपा असावी अशी विनंती केली. पुढे काही काळाने श्रीकृष्णाच्या कृपेने त्या स्त्रीला पुत्र प्राप्ती झाली व सुखी झाली.पायी चालत श्रीकृष्ण मंगसुळीला निघाले. रस्त्यात आरगेच्या लक्ष्मीचे दर्शन घेवून मंगसुळीला मुक्कामी पोहचले. श्री खंडेरायाचे दर्शन घेवून त्यांची स्तुती केली “तू आमचा कुलस्वामी आहेस. प्रत्यक्ष दर्शन देवून मला कृतकृत्य कर” अन्नपाणी सोडून लिंबाच्या झाडाखाली श्री खंडेरायाचे ध्यान करीत श्रीकृष्ण मंदिरासमोर बसले. दोन चार दिवस गेले इतक्यात तेथे एक ब्राम्हण आला आणि श्रीकृष्णांना म्हणू लागला “बाळा तुझे हे निर्वाण व्यर्थ आहे. कलीयुगी देवाने बौद्धरूप धरले आहे. त्यामुळे तुला प्रत्यक्ष दर्शन देणे / मिळणे कठीण आहे. देवाचा प्रसाद घेवून आल्या रस्त्याने परत जा “ब्राम्हणाचे भाषण ऐकूण श्रीकृष्णाला आश्चर्य वाटले.
ज्याअर्थी आपल्या मनातील श्री खंडेराय दर्शनाचा हेतू यास समजला त्याअर्थी हा ब्राम्हण सामान्य नसून सर्वज्ञ श्री खंडेरायाच असले पाहिजेत. श्रीकृष्ण देवांनी त्या ब्राम्हणास सांगितले निश्चयाने “नामदेवाने कपाळ फोडून श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले तर मीही नामदेवासारखे कपाळमोक्ष करीन, परंतु श्री खंडेरायाचे दर्शन घेईन “श्रीकृष्णाचा हा निश्चय / निर्धार पाहून ब्राम्हणाने ताबडतोब वेष पालटून नंदीवर बसून पार्वतीसह शंकराने /श्री खंडेरायाने प्रत्यक्ष दर्शन दिले व श्रीकृष्णाच्या मस्तकावर आशीर्वादाचा हात ठेवून म्हणाले “बाळ, तू माझाच अंश असून, दिन उध्दाराकरिता अवतार घेतला आहेस.अक्कलकोटला नुर्सिंहभान स्वामी त्रैमूर्तिचा अवतार आहेस. तेथे त्वरित जा. त्यांना गुरु करून घे व त्यांच्या आज्ञेने जग उद्धाराचे कार्य कर” इतके बोलून भगवान शंकर / श्री खंडेराया गुप्त झाले. श्री खंडेरायाचे / श्री शंकराचे दर्शन घेवून श्रीकृष्ण माता पित्यांना भेटण्यासाठी परत नांदणीला निघाले. श्रीकृष्ण श्री खंडेरायाच्या दर्शनाला मंगसुळीला जाऊन बरेच दिवस झाल्याने अन्नपूर्णाबाई घरात काळजी करीत बसल्या होत्या. बाळ लहान असल्याने बाहेर गावी मंगसुळीला गेला असल्याने तिला रुखरुख लागली होती. चैन नव्हता. शोकाकुल झाली होती. कधी एकदा मूल दृष्टीस पडेल असे तिला झाले होते. प्राण कंठात आला होता. इतक्यात एक दिवस अचानक श्रीकृष्ण घरी परतले. तिच्यापुढे उभे राहिले. अन्नपूर्णाबाईना अतिशय आनंद झाला. तिचा आनंद गगनात मावेना. त्यास आलिंगन देवून त्याची मुखकांती पाहून कोणीतरी योगी पुरुष आपल्या पोटी आला आहे असे वाटले.मुलाला काळाचे भय नाही. त्याचे संरक्षण देव करणार. किंबहुना दत्तानेच / देवानेच हा प्रत्यक्ष अवतार आपल्या पोटी घेतला आहे असे मानून अन्नपूर्णा बाई आनंदाने राहू लागली.