Admin
11/27/2021 6:46:18 PM
लेखक : श्री. बजरंग झेंडे.
चरित्र : समुद्र भरला आहे.
संदर्भ : कै. बाळासाहेब रामनाथ शिर्के लिखित श्री कृष्ण सरस्वती चरित्र.
(महानैवेद्य सेवा ग्रुप,कोल्हापूर)
१)श्रीकृष्ण सरस्वती महाराजांनी लक्ष्मीला कन्यारत्न दिले.
जोशी नावांचे एक गृहस्थ बेडग गांवात राहत होते. घरदार शेती वाडी होती, संपत्ती होती, संतती होती. त्यामुळे जोशी सुखाने प्रपंच करून बेडग गांवी राहत होते. पुढे कांही काळाने त्यांची पत्नी वारली. पत्नीचे निधन त्यांच्या शोकाला दु:खाला कारणीभूत झाले. दोन लहान मुलांना बघून तो रडत बसे. पुढे या मुलांचे कसे होणार या विचाराने त्याला चैन पडेना.पुढे जोशीचे दुसरे लग्न झाले. त्याच्या दुसऱ्या पत्नीचे नांव लक्ष्मी होते. तिचे माहेर कोल्हापूर होते. तिच्या भावाचे नांव विष्णुपंत होते. पुढे जोशी नोकरी निमित्त लक्ष्मी व पहिल्या पत्नीची दोन मुले घेवून कोल्हापूरला आला. व आपला मेव्हणा विष्णुपंत यांच्या घरी राहू लागला. पुढे कांही दिवस गेले. एकदा विष्णुपंत आपली बहिण लक्ष्मीला घेवून कुंभार गल्लीतील ताराबाई शिर्केंच्या घरी श्री कुंभार स्वामींच्या दर्शनाला भक्तिभावाने आला. सर्वांनी श्रद्धेने श्री स्वामींचे दर्शन घेतले. लक्ष्मी दर्शन घेताच श्री स्वामी तिला म्हणाले “तुला सुलक्षणी कन्या होईल.तिचे पालकत्व मी घेईन.” यावर लक्ष्मी श्री स्वामींना म्हणाली. “घरी सापत्न संबंध/ सावत्र नाते असताना मला आणखी कशाला मुलगी देता? सवतीची मुले आपली म्हणून मी सांभाळते आहे.मला मुलगी झालेस केवळ अनर्थ घडून येईल. दु:ख निर्माण होईल. मला मुलगी नको.” यावर श्री स्वामी लक्ष्मीला म्हणाले “जे मागता न मिळे, मिळता ते न टळे ही संचिताची फळे, गप्प उगीच बैस.”श्री स्वामींचे बोलणे लक्ष्मीला पटले नाही. तथापि, त्या रात्री लक्ष्मीला एक सुंदर स्वप्न पडले. तिच्या स्वप्नात चार मुसलमान फकीर दीप बरोबर घेवून आले व मुसलमानी भाषेत तिला म्हणाले. “सुनो बेटी हमारा सवाल, अल्लाका परसाद ले नारीयाल, निर्मल बेटी होगी, अच्छा खयाल करना,दो आना दाम देना, फिर जायेंगे मकाना” हे स्वप्न व फाकीरांचे बोल ऐकून लक्ष्मी घाबरून झोपेतून उठली व आश्चर्यचकित झाली.पुढे दुसऱ्या दिवशी तिला पडलेल्या स्वप्नातील चार फकीर प्रत्यक्ष तिच्या घरी भिक्षा मागायला आले, दारात येऊन उभे राहिले. फकीर तिला प्रसाद घेण्याविषयी विनंती करीत होते. तथापि, लक्ष्मीने प्रसाद घेण्याचे टाळले, शेवटी ते चारीही फकीर निघून गेले. सांयकाळी नोकरीवरून विष्णुपंत घरी येताच त्याला लक्ष्मीला पडलेले स्वप्न व प्रत्यक्षात तिला प्रसाद द्यायला आलेले फकीर हा प्रकार समजला. तो लक्ष्मीला म्हणाला “किती तुझी शुद्र बुद्धिमता, दैव देते आणि कर्म नेते हेच खरे” यावर आपली बहिण लक्ष्मीला विष्णुपंत कुंभार गल्लीतील श्री स्वामींच्या दर्शनाला घेवून आला व दर्शन घेवून म्हणाला “स्वप्नातील फकीर खरेच दुसऱ्या दिवशी दारात येऊन लक्ष्मीला प्रसाद देत होते. तो प्रसाद तिने घेतला नाही. हा तिचा मूर्खपणा आहे. तिचा अज्ञानपणा आहे. तथापि, तुम्ही तिच्यावर कृपा करा.” यावर श्री स्वामी म्हणाले “ एक दफे गाय अक्कल, बार बार दरशनकी मुश्किल, दो वक्त खाली गया बोल, सबका दिल नाखूष अभी, सपनोंके आदमी सच हुए, फिरभी लायेंगे उनको अभिच” असे बोलून श्री स्वामी लक्ष्मीकडे नाराजीने पाहू लागले. एवढ्यात सकाळी विष्णुपंत /लक्ष्मीच्या घरासमोर भिक्षेला आलेले तेजस्वी चार फकीर आले. त्यांनी स्वामी समोर नारळ ठेवून, श्री स्वामींना नमस्कार करून झटक्यात निघून गेले.श्री स्वामींनी फकीरांनी त्यांच्या समोर ठेवलेला नारळ घेतला व लक्ष्मीच्या ओटीत घालून तिला म्हणाले “एकदा ब्रम्हदेव देवून चुकला.मानवाने अपमान करू नये. जा सुखी राहा.” पुढे वर्ष गेले. श्री स्वामी कृपेने लक्ष्मीला सुंदर मुलगी झाली. त्या मुलीला घेवून लक्ष्मी श्री स्वामी दर्शनासाठी कुंभार गल्लीत आली. मुलीला श्री स्वामींच्या पायावर घालून दर्शन घेवून उभी राहिली. श्री स्वामींनी त्या लहान बाळाला / मुलीला उचलून घेतले. आशीर्वाद दिला व म्हणाले. “घाणवट खाऊ आली”
२)कोल्हापुरातील सरवीर पुणेकर, राजाराम खंडेराव यांना महाराजांनी धडा शिकवला.
कोल्हापूर छत्रपती शाहू महाराजांच्या दरबारात सरवीर पुणेकर म्हणून अधिकारी होता. त्याचा त्याच राज दरबारात राजाराम खंडेराव नावाचा मित्र होता. तो सरवीर पुणेकराचा वरिष्ठ अधिकारी जिगर मित्र असून, पुरा नास्तिक होता. एकदा सरवीर पुणेकर कुंभार गल्लीतील स्वामींच्या दर्शनाला जात असताना राजाराम खंडेराव सरसुभे हा जिगर मित्र त्यांच्या घरी भेटायला आला व तो त्यांना विचारू लागला. “कुठे निघालात” यावेळी सरवीर पुणेकर सरसुभेला म्हणाला “इथंच जवळच कुंभार गल्लीत ताराबाईच्या घरी नृसिंहवाडीचे साक्षात दत्त आहेत. त्यांच्या दर्शनाला चाललो आहे” यावर सरसुभे त्याला म्हणाला “ तुम्ही तर विद्वान, सद्सद विवेक बुद्धी सोडून मनुष्य रुपात तुम्ही दत्त पाहता हे योग्य नाही. तुम्हा आम्हाला तो मनुष्यच आहे” यावर सरवीर पुणेकर सरसुभेला म्हणाला "मी तर स्वामींच्या दर्शनाला चाललो आहे. तुम्हीपण चला त्यांच्या दर्शनाला. मग घेताच दर्शन ते मनुष्य आहेत की देव आहेत हे तुम्हांला कळून येईल मग तुम्हांला त्यांचे थोरपण कळून येईल. चला माझ्या बरोबर स्वामींच्या दर्शनाला” यावर दोघे मिळून ताराबाईच्या घरी स्वामींच्या दर्शनाला आले. सरसुभ्याला पाहून स्वामींनी त्याचा हात धरून त्याला शौचकुपात/ संडासमध्ये ढकलून कोंडून घातले.
तो प्रकार पाहून सरवीर पुणेकर घाबरून गेला. सरसुभे अधिकाराने उन्मत होता. तो आता स्वामींना व मला अतिशय त्रास देणार म्हणून पुणेकर घाबरून गेला. मीच जर सरसुभ्याला स्वामींच्या दर्शनाला आणले नसते तर हा प्रकार घडला नसता. स्वामींना व मला ताप झाला नसता असे सरवीर पुणेकराला वाटू लागले. एवढ्यात स्वामींनी शौचकुपाचे/ संडासचे दार उघडले. सरसुभे बाहेर आला व स्वामींच्या चरणावर लोळू लागला.क्षमा याचना करू लागला “ मी अनंत अपराधी आहे” म्हणू लागला. एवढ्यात सरवीर पुणेकर सरसुभेला म्हणाला ‘मी तुम्हाला स्वामींच्या दर्शनाला घेवून आलो हीच माझी चूक झाली आहे. मीच तुम्हांला आणले नसते तर हा प्रकार घडला नसता. आपण माझ्या घरी जाऊ या. थोडी विश्रांती घ्या म्हणजे तुम्हांला आराम वाटेल. झाल्या प्रकारा बद्दल मला क्षमा करा” यावर सरसुभे सरवीर पुणेकरांना म्हणाला, “आता घरी जायला नको. आरतीची वेळ आहे.आरतीचा लाभ घेवू या. पुन्हा अशी संधी मिळणार नाही. मी भाग्यवान आहे” आरतीचा लाभ घेवून दोन घटका स्वामींच्या सहवासात घालवून दोधे सरवीराच्या घरी आले. त्यावेळी उतावीळ होऊन सरवीर पुणेकराने सरसुभेला झालेल्या नास्तिक बुद्धीच्या परिवर्तनाबद्दल विचारले. त्यावर सरसुभे सरवीर पुणेकराला म्हणाला.“जेव्हा मला स्वामींनी शौच्च कुपात कोंडले त्यावेळी त्यांनी माझ्या कडून मी केलेल्या निंदेचा पाढा वाचून घेतला.मी केलेल्या निंदेचा पाढा इतर कोणाला माहित नव्हता. मी करीत असलेली स्वामी निंदा केवळ त्यांनाच ठाऊक होती. म्हणूनच ते सर्व त्यांनी कबूल करून घेतले. एकाच ठिकाणी बसून भूत-भविष्य-वर्तमान जाणतो. त्रिभुवन पालथे घालतो. त्याला कां जाऊ नये शरण तूच सांग” सरसुभेचे म्हणणे सरवीर पुणेकराला पटले. स्वामी विषयी त्यांचे प्रेम वाढले भक्ती वाढली. संशय पटल दूर झाले. साक्षात नृसिंह वाडीचे दत्त ते हेच म्हणून ताराबाईच्या घरी दर्शनाला येवू लागले.