माईसाहेब शिर्के

बाळासाहेब शिर्के


शिर्के कुटुंबीय मूळ कोकणातील. पुण्यश्लोक ताराईंच्या पतीचे नाव कृष्णाजी शिर्के होय. अनेक जन्माची पूर्व पुण्याईने ताराबाईंच्या नृसिंहवाडीच्या दर पौर्णिमेला वारी करण्याने श्री दत्त महाराज त्यांच्या घरी आले. ताराबाई शिर्केंचे घर हे कुंभार गल्लीत असल्याने श्री स्वामींना कुंभार गल्लीतील दत्त महाराज किंवा कुंभार स्वामी हेच नाव रूढार्थाने पडले. श्री कुंभार स्वामींचे नांव हे श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज असे असून, त्यांचा नांदणीला (ता. शिरोळ) आप्पाभट जोशी व अन्नपूर्णादेवी यांच्या पोटी शके सतराशे सतावन्न, माघ कृष्ण पंचमी, रविवार, सूर्योदयाला (दि.७/२/१८३६) रोजी झाला. श्री स्वामी समर्थ सन १८५७ च्या आसपास अक्कलकोटला प्रकट झाले. अंदाजे १८६० ते १८६५ दरम्यान श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज अक्कलकोटला श्री नृसिंहभान स्वामी म्हणजेच श्री अक्कलकोट स्वामी समर्थांच्या भेटीला गेले. त्यांच्यावर श्री स्वामी समर्थांनी कृपा करून, अनुग्रह करून श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांना करवीर / कोल्हापूर हे कार्यस्थळी नेमून देवून त्यांना करवीरला जाण्याची आज्ञा दिली. एका कुष्ठी ब्राम्हणाला बरोबर घेवून श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज करवीर / कोल्हापूरला आले. श्री अंबाबाईच्या देवळात पूर्व बाजूला असलेल्या श्री राम मंदिरात उतरले.

त्या कुष्ठी ब्राम्हणांचा कुष्ठरोग बरा केला. फडणीसाच्या बायकोला पिशाच्यमुक्त केले. अनेकांच्या वेदना, दु;ख दूर केले. एक दिवस ते ताराबाई शिर्केंच्या घरी दोनप्रहरी संपन्न, धनिक म्हैसाळकरांला बरोबर घेवून भिक्षेला उभे राहिले. “आई आई, भोजन दे, भिक्षा घाल” असे विनवून ताराबाईच्या घरासमोर उभे राहिले. पुण्यश्लोक ताराबाई शिर्केनी बाल स्वरूपातील दारासमोर उभा राहिलेल्या, भिक्षा मागणा-या श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांना ओळखले नाही. ताराबाई शिर्के ओली कोरडी भिक्षा घेवून बाहेर आल्या. परंतु ओली भिक्षा भाकरी, भाजी ही समोर उभा राहिलेल्या ब्राम्हण बटूला कशी द्यावी ? हा प्रश्न पडला. त्यांना नृसिंहवाडीला श्री त्रैमूर्ती दत्तांनी दिलेला दृष्टात आठवला नाही. त्यांनी श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांना ओळखले नाही. त्या भिक्षा मागणा-या ब्राम्हण बटू मूर्तीस पाहून, एक क्षण थांबून, शिजलेले अन्न कसे द्यावे असा मनात विचार आणून त्या दारात भिक्षेला उभा राहिलेल्या बटू मूर्तीतील श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांना म्हणाल्या “आपण ब्राम्हण दिसता. तुम्हाला शिधा सामान देते. स्वयंपाक करून तुम्ही भोजन करा” असे म्हणून परत घरात शिधा सामान आणण्यासाठी गेल्या. “स्वप्नातील दृष्टांत प्रमाणे आपणास ओळखले नाही. ताराबाईच्या मनांत द्वैतभाव ठाण मांडून बसला आहे. तिला आत्मशोधन करू दे” असे म्हणून श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज हे श्रीमंत केदारराव शिंदे सरकार (म्हैसाळकर) यांच्या बरोबर म्हैसाळ (ता. मिरज, जि. सांगली) ला आले. पुढे पोटशुळाने त्रस्त असलेली जिचा पूर्वसुकृत मोठा ठेवा आहे अशा ताराबाई नेहमी प्रमाणे पौर्णिमेला नृसिंहवाडीला श्री दत्त दर्शनाला आल्या व प्रार्थना करून म्हणाल्या “आता पोटदुखीच्या व्याधीमुळे येथून पुढे तुमच्या दर्शनाला येणे कठीण आहे. हे आता तुमचे शेवटचे दर्शन घेत आहे. तुम्हाला त्रिवार वंदन करीत आहे”. त्या रात्री ताराबाईनी नृसिंहवाडीत नेहमी प्रमाणे मुक्काम केला. स्वप्नात श्री दत्त महाराज ताराबाईच्या स्वप्नात आले व म्हणाले “बटू रूपाने तुझ्या दारात मी भिक्षेला उभा होतो. तू आम्हांला ओळखले नाहीस. तुझा भोग आता संपला आहे. व्याधी संपली आहे. आता मीच तुझ्या घरी येतो. म्हैसाळला मला न्यायला ये” स्वप्नातून ताराबाई खडबडून जागी झाली. तिला विस्मय वाटला, आनंदही वाटला. तिने श्री दत्तात्रेयाला ओळखले नाही याची मनोमन क्षमा मागितली. भिक्षेला आलेला बटू हाच दत्तात्रय होता, श्री दत्त अवतार होता याचा उलगडा स्वप्नाने केला होता. अधीरपणे ताराबाई कोल्हापूरला परत आली. घोडागाडी करून सत्वर ती म्हैसाळला आली. श्रीमंत केदारराव शिंदे (म्हैसाळकरांच्या) वाड्यावर गेली. श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांना / कृष्णनाथांना क्षमा मागून, भिक्षा मागण्यासाठी आपण माझ्या घरी आला होता. मी अज्ञानाने ओळखले नाही म्हणून सांगून कोल्हापूरला घरी चलण्याविषयी विनंती करून भावनेने, श्रद्धेने ताराबाई उभी राहिली. ताराबाईची शुध्द भक्ती, पूर्व सुकृत पाहून श्री कृष्णनाथांचे मन भरून आले. ते प्रसन्न झाले व म्हैसाळकरांना आशीर्वाद देवून ताराबाई बरोबर कोल्हापूरला तिच्या घरी निघाले, यथावकाश कोल्हापूरला पोहचताच ताराबाईनी कृष्णनाथांना पलंगावर बसवून, षोडशोपचार पूजा करून पक्वानांची ताटे समोर ठेवली. कृष्णनाथांना आई म्हणून भरविले. श्री कृष्णनाथ हे ताराबाईचे दैवत होते. श्री स्वामी ताराबाईला आई म्हणत. यशोदा – कृष्णेचे या जन्मातील त्यांचे नाते पुन्हा सुरु झाले. श्री स्वामी सेवा अविरत करून ताराबाई जीवन संपन्न करू लागली.

पुण्यश्लोक ताराबाईंच्या घरी श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज म्हणजे श्री कृष्णनाथ आले त्यावेळी त्यांचे वय अंदाजे पंचवीस वर्षाचे असावे. श्री स्वामींनी २०/८/१९०० साली समाधी घेतली. म्हणजे श्री स्वामींनी पुण्यश्लोक ताराबाई शिर्केंच्या घरी लहान मुलाप्रमाणे ४० वर्षे काढली. ते ताराबाई शिर्केंचे देव झाले. जगाचे देव झाले. पुण्यश्लोक ताराईमुळे श्री दत्त महाराज कोल्हापूरला आले व अनेक आर्त लोकांचा उद्धार केला हे सर्व ताराईमुळे घडले.

पुण्यश्लोक ताराई शिर्के व कृष्णाजी शिर्के यांना एक पुत्र होता. त्यांचे नाव दत्तात्रय / दत्तोबा असे होते. दत्तोबा शिर्केंच्या पत्नीचे नाव लक्ष्मीबाई होते. त्यांनी जन्मभर स्वामी सेवा केली. दत्तोबा शिर्के यांना एक पुत्र होता. त्यांचे नाव रामनाथ होते. रामनाथ शिर्के एक चांगले चित्रकार होते. त्यांचे व्यक्तिमत्व अत्यंत देखणे होते. श्री स्वामी सेवा, नित्य आरती, नित्य भजन असा त्यांचा दिनक्रम होता. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नांव लक्ष्मीबाई होते. लवकरच त्या वारल्या. श्री स्वामींच्या दृष्टाताने व भक्तांच्या आग्रहाने त्यांचे दुसरे लग्न हे कोल्हापूरातील शुक्रवार पेठेतील जैन स्वामींच्या मठा लगत राहणा-या श्री स्वामी भक्त परशुराम दौलती माने यांच्या क्रमांक दोनच्या हिरा नावाच्या मुलीबरोबर झाले. श्री स्वामी आशीर्वादाने शिर्केंच्या घरात आलेल्या या हिरा – सीता झाल्या. माईसाहेब शिर्के त्यांना म्हणले जाई. माईसाहेब या थोर तपस्वी होत्या. आज मठीतील पूजा अर्चा, उत्सव व इतर व्यवस्था याचा परिपाठ माईसाहेबांनी घालून दिलेला आहे. रामनाथ व सीताबाई शिर्के यांना तीन मुली व एक मुलगा पोटी जन्मले.


१. तारामती :

या सर्वात मोठ्या असून, लग्नानंतरचे त्यांचे नाव मंदाकिनी शंकरराव भोसले, कोल्हापूर होय.



२. मालुताई :

या क्रमांक दोनच्या कन्या लग्नानंतरचे त्यांचे नाव नलिनी मुरलीधर कदम, कोल्हापूर होय.


३. वसंतराव उर्फ बाळासाहेब :

हे तिसऱ्या क्रमांकाचे चिरंजीव. यांची जन्म तारीख २५/१०/१९२८ हे राजबिंडे व्यक्तिमत्वाचे प्रेमळ होते. उत्तम भजन म्हणणारे रेडिओ स्टार होते. उत्तम संगीत जाणणारे होते. त्यांनीही आपले सर्व आयुष्य स्वामी सेवा, भजन, पूजन यात समर्पण केले. बाळासाहेबांनी श्री स्वामींच्या वरील जुन्या पोथ्या, साहित्याचा अभ्यास करून नवीन स्वरुपात समजणेस सोपी अशी श्री कृष्ण सरस्वती दत्त महाराजांची पोथी लिहिली. त्या पोथीचे नांव “श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज चरित्र” होय.


४. लीलाताई :

या क्रमांक चारच्या कन्या. लग्नानंतरचे यांचे नांव लीलाताई मधुकर नाईक, कोल्हापूर असे आहे. कृष्णाजी शिर्केना एकच पुत्र नांव दत्तोबा / दत्तात्रय, दत्तोबा शिर्केना एकच पुत्र त्यांचे नाव रामनाथ शिर्के. रामनाथ शिर्के व सीतामाई शिर्के यांना तीन मुली व वसंतराव उर्फ बाळासाहेब एकच मुलगा. सीता / माईसाहेब या दि. ४/२/१९९४ ला स्वर्गवासी झाल्या तर बाळासाहेब दि. १९/११/१९९० ला स्वर्गवासी झाले. तारामती, मालुताई, लीलाताई याही स्वर्गवासी झालेल्या आहेत. स्व. वसंतराव उर्फ बाळासाहेब यांचा विवाह हा सातारा जवळच्या वेणेगाव येथील घोरपडे विजयादेवी यांचेशी झाला होता. बाळासाहेब व विजयादेवी यांनी आपले संपूर्ण आयुष्य माईसाहेब शिर्के यांनी आखून दिलेल्या परिपाठाप्रमाणे श्री स्वामींची सेवा केली. लोकांना प्रेमाने, अगत्याने वागवले व श्री स्वामी लौकिक वाढविला. विजयादेवी या दि. ६/८/२००२ ला कालवश झाल्या. स्व. बाळासाहेब व विजयादेवी यांच्या पोटी तीन अपत्ये जन्मली. त्यांची माहिती खालील प्रमाणे.

१. स्व. बबनराव उर्फ दत्तात्रय

स्व. बाळासाहेब यांचे सर्वात मोठे चिरंजीव ते शांत स्वभावाचे, संगिताची जाण असलेले होते. ते उच्चविद्याविभूषित होते. उत्तम फोटोग्राफर होते. उत्तम भजन म्हणणारे होते. त्यांचा विवाह कोल्हापुरातील दोनवडेकर कुटुंबातील गीतादेवी यांचेशी दि. ६/५/१९८० रोजी झाला. त्यांना दोन मुले असून, मोठ्या चिरंजीवाचे नाव रामनाथ (पिटू) असून, छोट्या चिरंजीवाचे नांव कृष्णनाथ (छोटू) आहे. बबनराव यांनी आपले संपूर्ण आयुष्य श्री स्वामी सेवेत भजन / पूजन / अर्चन यात शांतपणे घालविले आहे. श्री कृष्णनाथ यांनी भूगर्भ शास्त्रामध्ये पी.एच.डी. पूर्ण केली आहे. बबनराव हे दि. ३/१/२००२ रोजी स्वर्गवासी झाले आहेत.

२. स्व. शिवाजीराव:

स्व. बाळासाहेब यांचे क्रमांक दोनचे चिरंजीव. हे उत्कृष्ट तबलावादक होते. संगिताची जाण असणारे होते. तेही उच्च शिक्षित होते. उत्तम फोटोग्राफर होते. त्यांचा विवाह त्यांच्या वेणेगांवातील मामांच्या मुलीशी नलिनीदेवीशी दि. ६/५/१९८० रोजी झाला होता. स्व. शिवाजीरावांनी आपले संपूर्ण आयुष्य श्री स्वामी सेवेत घालविले. त्यांना एक मुलगी तिचे नांव राही असून लग्नानंतरचे नांव सौ. ज्योती किरण सुभेदार असून त्या डॉक्टर आहेत. त्या अमेरिकेत वास्तव्य करून आहेत. स्व. शिवाजीराव यांना एक मुलगा असून त्यांचे नांव इंद्रजीत असून ते इंजिनिअर असून प्राध्यापक आहेत. शिवाजीराव हे दि. २३/९/१९९१ रोजी स्वर्गवासी झाले आहेत.

३. महेश :

स्व. बाळासाहेबांचे हे तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात लहान चिरंजीव हे व्यापार शाखेतील उच्च पदवीधर असून, त्यांनी सुरुवातीला बँकिंग क्षेत्रात नोकरी केली आहे. परंतु घरातील अडचणीमुळे त्यांनी नोकरीचा राजीनामा देवून श्री स्वामी सेवा पत्करली. अंगावर पडलेली सर्व जबाबदारी स्वीकारून ती उत्तमपणे पार पाडली. कारण घरातील सर्व मोठी माणसे कालवश झालेली होती. यांचा शुभ विवाह कोल्हापुरातील मोहिनी यांच्याशी झाला. त्यांना सत्यजीत (सोनू) हा एकुलता एक मुलगा आहे. तोही उच्च शिक्षण घेत असून, उत्तम चित्रकार आहे. पुण्यश्लोक ताराई शिर्के यांनी श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज यांनी समाधी घेण्यापूर्वी (समाधी दि. २०/८/१९००) म्हणजे अंदाजे १८९७ च्या आसपास श्री स्वामी चरणी देह अर्पण केला, स्वर्गवासी झाल्या तेंव्हापासून आजतागायत शिर्के कुटुंबीयांनी ताराईंनी स्वामींची मागून घेतलेली अखंड सेवा उत्तम प्रकारे चालविली आहे. म्हणजेच श्री स्वामींचा वास शिर्केंच्या घराण्यात आहे. ताराईच्या पुण्याईने श्री स्वामींनी जगाचा उद्धार केला आहे. पहाटे पाच वाजता शिर्के कुटुंबीयांची सेवा काकड आरती पासून दिवस सुरु होतो. रात्रीच्या शेज आरतीनंतर दिवस संपतो. तेथून भोजन विश्रांती म्हणजे पहाटे पाच ते रात्री ११ हा सर्व काळ शिर्के कुटुंबीय श्री स्वामी सेवेत आनंदाने कार्यतत्परतेने सगळ्यांशी मिळून मिसळून गोड वागून, पूजा अर्चा / आरती, भजन, जयंती, पुण्यतिथी, गुरुद्वादशी उत्सव हे पार पाडतात. अशा प्रकारे ताराई शिर्के व आताचा सर्व शिर्के परिवार यामुळे सर्वांचा उद्धार झाला आहे. ताराई शिर्केंच्या जुन्या मठीचा आता नवीन मठीत / मंदिरात बदल झाला असून, सुंदर समाधी मंदिर झाले असून, वास्तूशांती दि. २३/३/२००९ रोजी पार पाडली.