Admin
11/20/2021 12:21:13 PM
अध्याय:-४ था
लेखक : श्री. बजरंग झेंडे
चरित्र : समुद्र भरला आहे.
संदर्भ : कै. बाळासाहेब रामनाथ शिर्के लिखित श्री कृष्ण सरस्वती चरित्र
(महानैवेद्य सेवा ग्रुप,कोल्हापूर)
१)जांभळी गावचे आबाजीपंत कुलकर्णी यांच्या घरातील वृद्ध स्त्रीला पंढरपूरचा प्रसाद दिला.
कांही काळ लोटल्यावर एके दिवशी जांभळी गांवचे आबाजीपंत कुलकर्णीच्या घरी एक मंगलकार्य ठरले होते. जांभळी गावाचे ग्राम जोशीपण आप्पाभट जोशींच्याकडे होते. लहान कृष्णास घेऊन आप्पाभटजी जांभळीला पौरहितासाठी गेले.मंगल कार्यक्रमानंतर आबाजीपंत कुलकर्णी घरची सर्व मंडळी दोन प्रहरी विश्रांती घेत / बोलत बसली होती. अशा वेळी त्या आबाजीपंत कुलकर्ण्याची वृद्ध पाहुणी स्त्री आबाजीपंतांना म्हणाली “ उद्या एकादशी आहे, पुष्कळ लोक पंढरपूरला विठ्ठल दर्शनाला निघाले आहेत.परंतु माझे सगळे आयुष्य संसारमोहपाशात खर्च झाले आहे. अमोलिक मनुष्यदेह प्राप्त होऊन सुद्धा विठ्ठल प्राप्ती झाली नाही. विठ्ठल दर्शन झाले नाही.६० वर्ष फुकटच गेली. तेंव्हा मला पंढरपूरला नेवून विठ्ठल दर्शन घडवा,श्री विठ्ठल भेटवा” यावर आबाजीपंत त्या वृद्धेला म्हणाले “आजीबाई, तुम्ही दु:ख वाटून घेवू नका, शोक करू नका. आषाढ महिन्यात तुम्हाला पंढरपूरला नेवून श्री विठ्ठल दर्शन घडवून आणूया”. हे आबाजीपंत कुलकर्ण्याचे बोलणे जवळच असलेल्या श्रीकृष्णाने ऐकले व त्या वृद्धेस म्हणाला “आजीबाई तुमचे वय झाले आहे. तुम्हाला आता वृध्दापकाळामुळे पंढरपूरला जाणे जमणार नाही. मी तुम्हाला येथेच पंढरपूरचा प्रसाद देतो” श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून सर्वजण हसू लागले. इतक्यात श्रीकृष्णाने हातातून दोन पुड्या काढून आजीबाईंना दिल्या. आजीबाईंना थठाच वाटली. परंतु आजीबाईंनी त्या पुड्या उघडून पाहिल्या व सर्व मंडळी चकितच झाली, एका पुडीत बुक्का तर एका पुडीत लाह्या फुटाणे होते.तसेच पंढरपूरहूनही कोणी तेथे आलेले नव्हते. श्रीकृष्णाचे हे अघटित कृत्य पाहून सर्वजण विस्मयचकीत झाले, त्याच्या बद्दल आदर वाढला व ते सर्वजण त्याला दत्तावतार मानू लागले.
२)श्रीकृष्ण सरस्वती महाराजांचे अक्कलकोटला प्रयाण व तिथे श्री स्वामी समर्थ यांनी श्रीकृष्ण सरस्वती यांना केलेला उपदेश व त्यांना "श्रीकृष्ण सरस्वती"असे नांव दिले
काही दिवस गेल्यावर श्री खंडेरायाच्या आज्ञेप्रमाणे आपणांस श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास अक्कलकोटला गेले पाहिजे असे श्रीकृष्णाने आपल्या आईला म्हणजे अन्नपूर्णाबाईंना सांगितले व अक्कलकोटला जाण्याची परवानगी मागितली. श्रीकृष्णाची विनंती ऐकून अन्नपूर्णाबाईंना आपल्यावर आकाशच कोसळत असल्यासारखे वाटले, त्यांचे डोळे पाण्याने भरून आले व त्या श्रीकृष्णाला म्हणाल्या “तुझ्या विरहाने आम्हा दोघांचे प्राण निघून जातील. तुझ्याशिवाय आम्हांला कोणी नाही.तू आमचा जीव प्राण आहेस. याकरिता आम्हांला सोडून जाण्याचा तू विचार सोड” हे ऐकून श्रीकृष्ण आईला म्हणाला “आई, तू चिंता करू नकोस. माझ्या ठिकाणी लक्ष / भाव ठेवून तुम्ही जीवनाची वाटचाल करावी. तुम्ही जेंव्हा जेंव्हा माझी आठवण काढाल, स्मरण कराल त्या त्या वेळी मी तुमच्या समोर हजर होईन. तुम्हा दोघांनाही अंतिम सद्गती प्राप्त होईल” आई वडिलांचा आशीर्वाद घेवून श्रीकृष्ण अक्कलकोटला गुरु दर्शनास निघाला. अक्कलकोट गांवाजवळ येताच श्री नृसिंहभान स्वामींनी त्यांना दर्शन दिले व वनांत एकांतवासात घेवून गेले. वनांत एका मोठ्या शिळेवर नृसिंहभानस्वामी बसले. श्रीकृष्णाने त्यांचे चरण दर्शन घेतले, षोडशोपचार मानसपूजा करून म्हणाले “तुम्ही प्रत्यक्ष नृसिंह सरस्वतींचा अवतार आहे. तुमची महती वेदही गाण्यास समर्थ नाहीत.आपल्या केवळ दर्शनाने माझ्या सर्व वासना नष्ट झाल्या आहेत. मी आता धन्य झालो आहे. तुम्हांला शरण आलो आहे. तुमच्या चरणाजवळ मला अखंड वास द्यावा.मला मोक्षाचीही इच्छा राहिली नाही. तुमची चरणसेवा हाच माझा मोक्ष” श्रीकृष्णाने ही केलेली स्तुती ऐकून श्री नृसिंहभान स्वामींना हसू आले आणि आनंदही झाला व ते म्हणाले “कृष्णा तू माझा अंश आहेस. तुझा व माझा गुरूशिष्यभाव फक्त लौकीकपुरता आहे. आपल्या उभयतांचा अवतार लोकसंग्रहा करिता आहे. खरे म्हणजे आपण दोघे एकच आहोत. आपले अवतार कार्य सुरु करण्यासाठी तू करवीरास जावे. शरणागतांचा ताप, दु:ख कमी करून त्यांचा उद्धार करावा” असा बोध करून नृसिंहभान स्वामींनी श्रीकृष्णाच्या मस्तकावर आपला कृपाहस्त ठेवला व त्यांना "श्रीकृष्ण सरस्वती" असे नांव दिले व त्यानंतर दोघेही आनंदसागरात डुंबून गेले. श्रीकृष्ण समाधी अवस्थेत निमग्न होऊन गेले. काही काळाने श्रीनृसिंहभान स्वामी श्रीकृष्णास घेवून वटवृक्षाखालील मठात आले. मठातील शिष्यांनी गोड पक्वान्नाचे जेवण दिले. पुढे काही दिवस श्रीकृष्ण श्री नृसिंहभान स्वामींच्या सेवेत राहिले.
एके दिवशी तेथे कुष्ठी ब्राम्हण आला व नृसिंहभान स्वामींना म्हणू लागला. “महाराज, मी तीन महिने गाणगापुरास निराहारी राहून श्री दत्तात्रेयांची आराधना, उपासना केली. त्यांची आज्ञा झाली की, अक्कलकोटला त्रेमूर्तीचा अवतार तुमच्या रूपाने प्रकट झाला आहे. अक्कलकोटला जावून तुमची सेवा करावी म्हणजे कुष्ठरोग परिहार होईल. नाहीसा होईल. श्रींची आज्ञा ऐकून मी येथे तुमच्या दर्शनासाठी अक्कलकोटला आलो आहे”. त्या ब्राम्हणाचे सर्व ऐकून श्री नृसिंहभान स्वामींनी श्रीकृष्णाकडे बोट दाखवून म्हणाले, “श्रीकृष्णा बरोबर तू करवीरास जा, त्यांची सेवा कर म्हणजे तू कुष्ठरोगातून मुक्त होशील” यावर तो महारोगी ब्राम्हण स्वामींना म्हणाला व गयावया करू लागला. “मी आता फार थकलो आहे. गाणगापूरला मी तीन चार महिने आराधना केली आहे. मी आता कंटाळलो आहे. आपल्या कृपेने मला येथेच बरे करा. करवीरला पाठवू नका” यावर क्रोधीत होवून श्री नृसिंहभान स्वामी त्या ब्राम्हणाला म्हणाले “तू येथून चालता हो” यावर भयाने ब्राम्हणाने श्री नृसिंहभानांची क्षमा मागितली. ब्राम्हणास बरोबर घेवून त्याजकडून सेवा करून घेण्यास श्रीकृष्णास सांगितले. कांही दिवसानंतर करवीरी जाण्यासाठी श्रीकृष्णास निरोप दिला. कुष्ठी ब्राम्हणास बरोबर घेवून लोकोध्दारासाठी श्रीकृष्ण करवीरी येण्यास निघाले.
३)गोविंदला मुलगा झाला
श्रीकृष्ण स्वामी त्या कुष्ठ ब्राम्हणासह एका खेडेगांवात आले व गांवा बाहेरील मंदिरात मुक्कामास राहिले. बरोबर असलेल्या ब्राम्हणाची सत्व परीक्षा घेण्यासाठी त्याला मध्यरात्री पिण्यासाठी दूध मागितले. मध्यरात्रीची वेळ, सर्व लोक निर्दीस्त, आपण तर परस्थ तेंव्हा आता दूध कसे मिळणार असे त्याला वाटू लागले. परंतु श्रीकृष्ण स्वामींची आज्ञा मानून एक भांडे घेवून गांवात दूध मागण्यासाठी तो ब्राम्हण गेला. गांवात सर्वत्र सामसूम होती. एका घरात मात्र दिवा दिसत असून घरातील मंडळीचा गोंगाट त्याच्या कानावर पडला. तेथे जावून पाहतो तर काय त्या घरातील मालकीण तीन दिवस बाळंतपणात अडकली होती. बाळंतपण पूर्व वेदनांनी ती अंथरुणावर तळमळत पडली होती. घरचे सर्व चिंतेत पडले होते. ते ऐकून त्या कुष्ठरोगी ब्राम्हणाला त्या बाईचा कळवळा आला व तो त्या घरातील पुरुष मंडळीना म्हणाला “गांवाबाहेरील देवळात माझे गुरु आहेत. त्यांच्या कानावर ही गोष्ट घाला म्हणजे बाई सुखरूप बाळंत होईल”.आपण कशाकरिता आलो हे सांगून दूध मागून घेवून तो ब्राम्हण त्या बाईच्या मालका बरोबर परत निघाला.उभयता देवळाजवळ येताच श्रीकृष्ण स्वामींनी मोठ्याने हाक मारून सांगितले की, “गोविंदा तुझी मंडळी सुखरूप बाळंत झाली असून तुला मुलगा झाला आहे. परत जा” हे ऐकून गोविंदपंतास आश्चर्य वाटले व मनात म्हणू लागले “न माझी ओळख ना पाळख माझे नाव यांना कसे समजले ? मंडळी बाळंतपणासाठी आडली आहे हे यांना कसे माहित ? हे कोणीतरी सत्पुरुष असावेत. या सत्पुरुषाचे दर्शन घेवून यांना घरी घेवून जावे”. स्वामींचे दर्शन घेऊन घरी येण्याविषयी विनंती करू लागले. श्री कृष्ण स्वामींने गोविंदपंताच्या डोकीवरील रुमाल उलटा सुलटा करीत त्याला म्हणाले “आमचा कार्यभाग पुरा झाला आहे. आम्ही घरी येणार नाही” असे म्हणून त्याचा रुमाल त्याच्या अंगावर टाकला व परत घरी जाणेस सांगितले. गोविंदपंत निरुपयाने घरी परतला. कुटुंब सुखरूप बाळंत होऊन मुलगा झाल्याचे पाहून तो आनंदला.
४)कोल्हापूरला श्री महालक्ष्मी मंदिरात पूर्व बाजूच्या राम मंदिरात मुक्काम
मार्गक्रमण करीत श्री कृष्णस्वामी त्या कुष्ठी ब्राम्हणासह करवीरी आले. श्री महालक्ष्मीचे दर्शन घेऊन पूर्वद्वारा नजिकच्या राममंदिरात त्यांनी वस्ती केली. कुष्ठी ब्राम्हण रोज मधुकरी मागून श्री कृष्ण स्वामींना भरवून मगच प्रसाद घेत असे. एके दिवशी संध्याकाळी एक स्त्री रामदर्शनास आली. तिला बऱ्याच दिवसापासून पिशाच्च बाधा होती. पिशाच्च बाधेमुळे ती अत्यंत दु:खी व कृश झालेली होती. तिची व श्रीकृष्ण स्वामींची दृष्टादृस्ट होताच तिला समंधाचा संचार होवून, गरगर डोळे फिरवून ती तेथेच बेशुद्ध पडली.आजूबाजूचे सर्व लोक घाबरले व तिच्या तोंडात पाणी घालण्याची खटपट करू लागली. एवढयात ती स्त्री मोठ्याने ओरडून म्हणू लागली “दत्त महाराज मी या स्त्रीचा पूर्वजन्मीचा वैरी आहे. आता तिच्यामुळे मला तुमचे दर्शन झालेले आहे. माझ्या अपराधांची क्षमा करून मला या पिशाच्च योनीतून मुक्त करून माझा उद्धार करा” त्यावर श्रीकृष्ण स्वामी म्हणाले “या बाईमुळे तुझा उद्धार झालेला आहे. या बाईला सोडून तू आता निजधामाला जा”. काही वेळाने ती स्त्री शुद्धीवर आली व खडबडून उठली.
आपण सर्वादेखत अस्ताव्यस्त पडल्याचे पाहून ती घाबरली. जवळच्या बायकांनी तिला घरी पोहचविले व सर्व हकीकत तिच्या नवऱ्याच्या कानावर घातली. आपल्या कुटुंबाची पिशाच्चबाधा श्रीकृष्ण स्वामींनी दूर केल्याचे ऐकून तो श्री स्वामींच्या दर्शनासाठी श्रीराम मंदिरात आला. बारा वर्ष समंधाने आपल्या घराचा सर्वनाश केला. संसार उध्वस्त केला. आपल्यामुळे आपले कुटुंब पिशाच्चमुक्त झाले म्हणून त्याने घरी येण्यासाठी स्वामींना विनंती केली. परंतु श्रीकृष्ण स्वामी काहीच बोलले नाहीत. सोबत असलेल्या कुष्ठी ब्राम्हणाने त्या बाईच्या पतीस सांगितले. “स्वामी घरी येणार नाहीत. ते जेथे असतील तेथेच तुम्ही दर्शन घेत जा”. हे ऐकून तो गृहस्थ निरुपाय होवून घरी परतला.