करवीरनगरी “कोल्हापूर” येथील शिरोळ तालुक्यामध्ये नांदणी नावाच्या छोट्याशा खेडेगावात अप्पाभट जोशी आणि अन्नपूर्णाबाई सुखा समाधानाने राहत होते . नांदणी येथे भिक्षुकीचे परंपरागत काम करणारे अप्पाभट हे भारद्वाज गोत्राचे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण, प्रखर दत्तोपासक होते. अन्नपूर्णाबाईदेखील सत्वशील व धर्मपरायण होत्या. उभयता पतीपत्नी नित्यनेमाने जवळच्याच ‘नरसोबाची (नृसिंह) वाडी’ या दत्तक्षेत्री दर शनिवारी आणि प्रत्येक पौर्णिमेस जात असत. घरामध्ये सुखसमाधान नांदत असले तरी पोटी संतान नसल्याने पतीपत्नी मनाने कायम उदास असत. नृसिंहवाडी’ सारख्या जागृत स्थानी नित्यनेमाने जात असताना श्रीदत्तमहाराजांच्या चरणी आपल्या मनातील सल आणि रुखरुख व्यक्त करावयास हवी असे अन्नपूर्णाबाईंचे मत होते. मात्र तसे करण्यास अप्पा भटाना संकोच वाटत असे.

अशा घालमेलीत बराच काळ निमाला . मात्र पुढे अप्पा भटानीच ही कोंडी फोडली आणि एके दिवशी स्वतःहूनच श्रीगुरुचरणी आपली कैफियत मांडली. त्याच रात्री तिथे मुक्कामास राहिलेल्या अप्पा भटाना रात्री यतिवेषधारी श्रीगुरु नृसिंह सरस्वतींचा स्वप्नदृष्टांत झाला आणि श्रीदत्तगुरुंनी अप्पा भटाना “ उगीच चिंत्ता करू नये. मीच तुझ्या घरी जन्म घेईन” अशी निखालस ग्वाही दिली. पुढे यथासमयी श्रीगुरूंचा स्वप्नदृष्टांत फलदायी ठरला. अन्नपूर्णाबाईंना मातृत्वाची चाहूल लागली.

अप्पाभटांचे घर आनंदाने न्हाऊन गेले असले तरी अन्नपूर्णाबाईंना मात्र काही विचित्र पद्धतीचे डोहाळे लागले. त्यांचे खाण्यापिण्याचे भान पुरते निमाले होते. त्यांना सतत मारुती मंदिरामध्ये बसून राहावेसे वाटे. त्यांच्या मनात सतत उंच सिंहासनावर बसण्याची किंवा पालखीतून फिरण्याची इच्छा येत असे. त्यांचे हे वागणे पाहून आप्तेष्ट चिंतातुर झाले असले तरी अप्पा भट निवांत होते. ते स्वतः उत्तम ज्योतिषी असल्याने ही सर्व लक्षणे श्रीदत्तमहाराजांचा पूर्णावतार जन्माला येण्याचे सुतोवाच करणारी आहेत हे त्यांना समजून चुकले होते.

माघ वद्य पंचमी, शके १७५७ मकर लग्न , हस्त नक्षत्रावर रविवारी सूर्योदय समयी अर्थात ७ फेब्रुवारी १८३६ रोजी अन्नपूर्णाबाईंच्या पोटी दत्तावतार जन्म घेता झाला. अप्पाभटानी नवजात बालकाचे तेज पाहून उपाध्यायास बोलाविले व जन्म – लग्न कुंडली तयार करण्यास सांगितले , त्यानी तात्काळ जन्म – लग्न कुंडली मांडून असे भविष्य वर्तविले की, “या अलौकिक बालकाच्या पत्रिकेत ‘ब्रह्मनिष्ठ व जीवनमुक्त’ योग आहेत. हे बालक सर्वसामान्यांमध्ये मूढपणाने वागेल. निजानंदी निमग्न राहील. हे बालक कुणाच्याही निंदा वा स्तुतीला भाळणार नाही. या बालकामध्ये अवधूत योग्याची, सिध्द सत्पुरुषाची सर्व लक्षणे आहेत. हा ब्रह्मचारी राहील. सर्वत्र संचार करून लोकोध्दाराचे कार्य करील. तसेच अनेकांना भगवदभजनी दृढ करून त्यांना मोक्षाचा मार्ग दाखवील.”

नवजात बालकाचे बारसे मोठ्या थाटामाटात करण्यात आले आणि त्याचे नाव ‘श्रीकृष्ण’ ठेवण्यात आले. हे अदभूत बालक जन्माला आल्यापासून रडलेच नाही. इतकेच नव्हे तर त्याने मातेच्या दुधास स्पर्शदेखील केला नाही. तो नित्य आनंदी दिसत असे. अन्नपूर्णाबाईंसाठी बाळाचे हे वागणे विलक्षण कष्टदायी होते. बऱ्याच वर्षांनी जन्मलेले हे लेकरू दुग्धपान करीत नाही या कारणाने मातेचा पान्हा वाया जात होता. बालकाच्या लीला मन तृप्त करीत असल्या तरीही माऊली काही अंशी पुत्रसौख्याला वंचितच राहिली. अशातच एक वर्ष पूर्ण झाले.

अन्नपूर्णाबाईंनी श्रीकृष्णबाळाला नृसिंहवाडी तसेच मंगसुळी येथील कुलदैवत श्रीखंडेराया चरणी नेण्याचे ठरविले. अप्पाभटांसह निघालेली हि मंडळी श्रीदत्त दर्शन घेऊन मंगसुळी येथे आली . तेथे त्यांनी भक्ती भावाने खंडेरायाचे दर्शन घेतले व आनंदाने नांदणीला परतले . दुसऱ्यावर्षी सुध्दा कृष्णबाळ दुग्धपान करीत नसल्याने उष्टावण समारंभ केला. मात्र बाळ मुखी अन्न घेईना. बळेच भरवू पाहता तो अन्न बाहेर थुंकून टाकता झाला. आता श्रीदत्तगुरूच या बालकाचे पालनपोषण करतील असे मनाशी योजून ते निवांत राहिले.

बालक दिसामासाने वाढत होते. आनंदाने हसत खेळत होते. मात्र बोलणे आणि खाणे या दोन्ही क्रिया करण्यास ते अनुत्सुक असे. अनेकांना कृष्णबाळ मुका असावा अशी शंका येत असे. पुढे पाचेक वर्षांनी श्रीकृष्ण तोडकेमोडके बोलू लागला. मात्र त्याचे बोलणे अगम्य आणि विसंगत होते. सदानकदा भल्यामोठ्या दगडावर बसून तो आपण राजा असल्याचे भासवीत असे आणि “सर्वांच्या समस्या व त्रास मी दूर करतो” असे सांगून तो आपल्या सवंगड्यांवर अधिकार गाजवीत असे. आपल्याच मस्तीत राहणारा श्रीकृष्ण कधी कधी मित्रांना सांगत असे की, “ अरे, तुम्ही माझ्या पाया पडा. मी तुम्हाला तुमच्या सर्व पापातून मुक्त करीन. माझे तीर्थ व अंगारा घ्या म्हणजे तुम्ही दोषमुक्त व्हाल.” वयाच्या आठव्या वर्षी श्रीकृष्णाचे मौंजीबंधन (मुंज) करण्यात आले त्यावेळी श्रीकृष्णाला गायत्री मंत्राचा नीट उच्चार करता येत नसे.

काही दिवसांनी श्रीकृष्ण मंगसुळी येथे कुलदैवत श्रीखंडेरायाच्या दर्शनास जाण्यासाठी हट्ट करता झाला. अन्नपूर्णामाता तयार होईना मात्र अप्पाभटानी पुढाकार घेत पत्नीस समजावले आणि श्रीकृष्णास शिदोरी देऊन मंगसुळीस धाडले. श्रीकृष्ण मोठ्या आनंदाने निघाला. बेडग गावामध्ये एका विहिरीच्या काठावर त्याने आईने दिलेली शिदोरी ठेवून विहिरीत स्नानासाठी उतरला त्याच वेळी एक श्वान (कुत्रे) तिथे आले व त्याने काठावरील शिदोरी पळवून नेली. नेमकी त्याचवेळी एक स्त्री तिथे पाणी भरण्याकरिता आली असता तिचे लक्ष आनंदात दंग झालेल्या या गोऱ्यापान बटू मूर्तीकडे गेले . तिला तेथे पाहून श्रीकृष्ण लागलीच विहिरीबाहेर आला आणि तिचा पदर धरून म्हणू लागला की माझी शिदोरी श्वानाने पळवून नेली हे तू पाहिलेस व मला आता फार भूक लागली आहे. या साजिऱ्यागोजिऱ्या तेजस्वी बालकाचा ओळखपाळख नसताना केलेला हा आगळावेगळा हट्ट त्या मूळच्या निपुत्रिक असलेल्या माऊलीला कमालीचा सुखावून गेला. तिने श्रीकृष्णास आपल्या घरी आणले.

बालपणापासून आईच्या हातचे काहीही न खाणारा कृष्णबाळ त्या स्त्रीने समोर ठेवलेला दहीभात मनापासून खाता झाला. त्याच्या त्या निरागस बाललीला पाहून ती स्त्री हरखली आणि त्यास आपलाच मुलगा जाणून स्वहस्ते भरवू लागली. श्रीकृष्णाने तिच्या हातून दहीभात खाण्याचा हट्ट पूर्ण केला आणि लागलीच तिथून प्रयाण केले. त्या स्त्रीने जेव्हा त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला तेव्हा श्रीकृष्णाने तिला “पुत्रवती भव” असा आशीर्वाद दिला (हा आशीर्वाद काही काळाने प्रत्यक्षातही साकारला) आणि तिथून त्वरेने तो मंगसुळीस निघून आला.

मंगसुळीस येताक्षणीच श्रीकृष्णाने श्रीखंडेरायाच्या प्रत्यक्ष दर्शनाचा ध्यास घेतला. त्याने एका लिंबाच्या झाडाखाली ठाण मांडले आणि जोवर श्रीखंडोबा स्वतः प्रकट होत नाहीत तोवर तिथून कुठेही न जाण्याचे ठरविले अशातच बराच काळ लोटला. त्यावेळी तिथे एक ब्राह्मण आला व श्रीकृष्णाला म्हणाला कि, तू इथे व्यर्थ बसला आहेस कारण या कलीयुगात भगवंताचे प्रत्यक्ष दर्शन होणे कठीण आहे, त्यामुळे तू प्रसाद घेऊन परत जा. त्यावेळी श्रीकृष्णाने त्याला उलटा प्रश्न केला कि, “ तुम्हाला कसे कळले कि मी खंडोबाचे दर्शन होण्यासाठी इथे बसलो आहे ते ?” श्रीकृष्ण त्यांना म्हणाला कि, खंडोबाचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याशिवाय मी इथून जाणार नाही . त्याचा तो निर्धार पाहून त्या ब्राह्मणाने आपले रूप बदलले व साक्षात श्रीशंकर नंदीवर बसून पार्वतीसह तिथे अवतरले आणि प्रसन्न चित्ताने श्रीकृष्णास सांगते झाले, “अरे, तू माझाच अंश आहेस. आता तू निघ. माघारी जा आणि अक्कलकोटी जाऊन श्रीनृसिंहभान (स्वामी समर्थ) यांची भेट घे तेच तुझे गुरु आहेत.

कुलदैवत श्रीखंडेरायाने मूळ रुपात, साक्षात शिवरुपात प्रकट होऊन पुढील वाटचालीविषयी बोध केल्याने समाधान पावलेला श्रीकृष्ण त्याच्या नांदणी गावी परतला. कृष्णबाळाच्या मुखावरील अपार तेज पाहून मातापिता चकित झाले. श्रीकृष्णाने घडलेला समग्र वृतांत कानी घातला. ते ऐकून मायबाप कृतार्थ झाले असले तरीही कृष्णबाळ श्रीगुरुदर्शनार्थ पुन्हा एकदा घराबाहेर निघणार असल्याचे समजल्यावर ते चिंतित झाले. कासावीस झाले मात्र श्रीकृष्णाने त्याच्या मातेस, ‘तुम्ही चिंता करू नका. तुमचे चित्त माझ्या ठायी असुद्या तुम्ही स्मरण करताच मी तुमच्या समोर हजर आहे. तसेच तुम्हाला सद्गती प्राप्त होईल असे नि:संदिग्ध वचन दिले. आणि तो अक्कलकोटास प्रयाण करता झाला अप्पाभट आणि अन्नपुर्णाबाई या उभयतांनी आपल्या या जगावेगळ्या बालकास साश्रुपूर्ण नयनांनी निरोप दिला.

मातापित्यांचा निरोप घेऊन श्रीकृष्णाने नांदणीहून प्रयाण केले. सतत तीन दिवस. तीन रात्र अथक आणि अविश्रांत पायपीट करून श्रीकृष्णाने अक्कलकोट नगरीची वेस ओलांडली. प्रज्ञापुरीत प्रकटलेले, मनुष्यदेहात सामावलेले आणि ‘श्रीस्वामी समर्थ’ ही नाममुद्रा धारण केलेले परमेशतत्व त्यादिवशी पहाटेपासून श्रीकृष्णाची आतुरतेने वाट पहात होते. श्रीकृष्ण श्रीस्वामी दरबारात पोहोचला. त्यास समोर उभे पाहताच श्रीस्वामीरायांनी दोन्ही हात पसरून त्याचे स्वागत केले. श्रीकृष्ण लगबगीने त्यांच्यापाशी गेला तोच श्रीस्वामी समर्थांनी त्यास प्रेमाने जवळ घेत पोटाशी कवटाळले. श्रीकृष्ण गहिवरला, त्याचा कंठ दाटून आला. श्रीस्वामीरायांनी कृष्णबाळाच्या गालावरून, पाठीवरून हात फिरवीत त्याच्यावर मायेचा अपार वर्षाव केला. त्याच्या दोन्ही गालांचे वारंवार मुके घेतले. हे दृश्य पाहून तेथील भक्तमंडळीनी ‘हा नक्कीच कोणीतरी अवतारी सत्पुरूष आहे.’ याची नोंद घेतली. एवढ्यात अचानक श्रीस्वामी समर्थ उठले आणि श्रीकृष्णाचा हात धरून तेथून निघाले. अवचितपणे घडलेला हा प्रकार पाहून क्षणभर गोंधळलेली भक्तमंडळी भानावर आली तोवर श्रीस्वामीराय श्रीकृष्णासह तिथून वायुवेगाने दूर जात दिसेनासे झाले.

श्रीस्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोट पासून बऱ्याच दूरवर, विस्तीर्ण व घनदाट वृक्षांनी व्यापलेल्या एकांतस्थळी श्रीकृष्णास आणले आणि तेथील एका सपाट कातळावर ते बसले. लागलीच श्रीस्वामीचरणी लोटांगण घालून श्रीकृष्ण त्यांची अपरंपार स्तुती करता झाला. श्रीस्वामीरायांची मनोभावे प्रार्थना करून त्याने ‘आपल्यावर पूर्ण कृपा करावी’ अशी त्यास विनंती केली. त्यावर श्रीस्वामी म्हणाले. “बाळ, तू अन् आम्ही काही वेगळे नाही. तू माझाच अंश आहेस. अनादी अनंत अशी ही श्रीगुरुपरंपरा पुढे नेण्यासाठी तू जन्म घेतला आहेस. तेव्हा काही काळ मजपाशी राहावे. तद्नंतर पुढील कार्य करण्याच्या हेतूने तू करवीरक्षेत्री जावे आणि अवधूतस्वरूप धारण करून तेथे जगदुद्धाराचे कार्य करावे. या कारणे मूळ रूप त्यागून बालोन्मत्तपिशाच्च वृत्ती धारण करणे योग्य ठरेल. तुझा अवतार विशिष्ट कार्यासाठी झाला आहे बरे!”

श्रीस्वामी समर्थ महाराजांनी अतिशय वात्सल्याने श्रीकृष्णाच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला आणि ते म्हणाले, “आम्ही आमचेच तत्व आपल्यामध्ये पाहतो आहोत, आम्ही तुम्हांस अधिकारपद देत आहोत. आजपासून आपली ओळख सर्वत्र सर्वदूर ‘श्रीकृष्ण सरस्वती’ या नावाने होईल.” श्रीस्वामीरायांचा स्पर्श बुद्धीग्रामास घडताच श्रीकृष्ण भावसमाधीत दंग झाला. त्या दिव्य भावावस्थेत असतानाच त्यास श्रीस्वामीरायांनी नियोजित अवतारकार्याचे रहस्य आणि प्रयोजना विषयी अवगत केले. यात बराचसा काळ सरला त्यानंतर समाधीवस्थेचा परमानंद लुटणारा श्रीकृष्ण जागृतावस्थेत आला तेव्हा ‘श्रीकृष्ण सरस्वती’ या संबोधनाचे वलय त्याच्या सभोवती दिमाखाने विलसत होते.

या घटनेनंतर श्रीस्वामी समर्थ महाराजांनी श्रीकृष्ण सरस्वतीसह पुन्हा अक्कलकोटात येणे केले. त्यादिवशी श्री स्वामीरायांनी भक्तमंडळींना सांगून श्रीकृष्ण सरस्वतींकरिता पंचपक्वान्ने तयार करविली. मोठा समारंभ घडवून आणला आणि आनंदाचा सोहळा घडवीत श्रीकृष्ण सरस्वतींना आपल्यासोबत बसवून जेऊखाऊ घातले. त्यानंतर काही दिवस श्रीकृष्ण सरस्वती स्वामीरायांच्या सेवेत राहिले. या अवधीत श्रीकृष्ण सरस्वतींनी श्रीस्वामी माऊलींचे वात्सल्यसुख पुरेपूर अनुभवले.

एकेदिवशी गाणगापुरास गेलेला कुणी एक कुष्ठरोगी ब्राह्मण श्रीदत्तप्रभूंच्या दृष्टांत सुचनेनुसार अक्कलकोटी आला. श्रीस्वामीमहाराजांच्या चरणांशी लोळून त्याने त्याच्या त्या असाध्य रोगातून मुक्त करण्याची विनंती श्रीस्वामींपाशी केली. तेंव्हा श्रीस्वामीरायांनी त्यांच्या शेजारीच बसलेल्या श्रीकृष्ण सरस्वतींकडे बोट दाखवून त्या कुष्ठरोग्यास “ अरे , आता तू या श्रीकृष्ण गुरुसमवेत करवीर (कोल्हापूर) येथे जाऊन त्यांचीच सेवा कर म्हणजे तुझे कुष्ठ नाहीसे होईल.” असे सांगितले श्रीस्वामीरायांचे हे बोलणे ऐकून कुष्ठरोगाने त्रस्त झालेला तो ब्राह्मण श्रीकृष्ण सरस्वतीकडे जाण्यास कां कू करू लागला. हे पाहून श्रीस्वामी समर्थांनी त्या ब्राह्मणास काहीशा रागाने तू इथून चालता हो असे सांगितले त्यावेळी ब्राह्मणाने घाबरून स्वामींची क्षमा मागितली व श्रीकृष्ण सरस्वतीं बरोबर जाण्यास तो तयार झाला त्याच वेळी श्री स्वामी समर्थांनी श्रीकृष्ण सरस्वतीना त्या ब्राह्मणास बरोबर घेवून करवीरी जाण्याची आज्ञा केली . अक्कलकोटहून कोल्हापुरास येते वेळी श्रीकृष्ण सरस्वतीनी काही अदभुत आणि अतार्किक लीला दाखवल्याने कुष्ठरोगी ब्राह्मणाचा श्रीकृष्ण सरस्वतींबद्दलचा आदर आणि आत्मीयता कित्येक पटींनी वाढली

करवीरनगरीचे आद्य दैवत. श्री अंबाबाई(श्री महालक्ष्मी) मंदिर परिसरातील राम मंदिरामध्ये श्रीकृष्ण सरस्वतींनी मुक्काम केला. येथे येता क्षणीच त्यांनी अनेक भाविकांना संकटमुक्त केले त्यात अक्कलकोटहूनआलेल्या कुष्ठरोगी ब्राह्मणाचा देखील समावेश होता.

श्रीकृष्ण सरस्वतींच्या अवतारमहात्म्याचा परिचय कोल्हापूरवासियांना जसजसा होत गेला तसतशी त्यांच्या अवतीभोवती दर्शनार्थींची गर्दी वाढली. या भक्तमंडळींमध्ये फडणवीस नावाचे एक भक्त मात्र भाग्यवान ठरले कारण त्यांच्या इच्छेला मान देवून श्रीकृष्ण सरस्वतींनी काही दिवस त्यांच्या घरी मुक्काम केला. फडणवीसांच्या पत्नीला मात्र श्रीकृष्ण सरस्वतींविषयी फारशी आस्था नव्हती. त्यातच एके दिवशी फडणवीसांचे एकुलते एक लहान मुल दगावले. हे अशुभ घटीत श्रीकृष्ण सरस्वती महाराजांच्या येण्यामुळेच ओढवले आहे असा फडणवीसांच्या पत्नीचा गैरसमज झाला तेव्हा महाराज तिथून निघाले. पुढे कालांतराने महाराजांच्या कृपेने फडणवीसांची वंशवेल बहरून आली आणि त्यांच्या पत्नीचा महाराजांविषयीचा गैरसमजदेखील निकाली निघाला.

फडणवीसांच्या घरातून निघालेले महाराज, त्यांच्या दर्शनार्थ आलेल्या म्हैसाळकर नामक भक्ताचा हात धरून त्यांच्या सोबत निघाले. ही संधी योग्य आहे असे मनाशी ठरवून म्हैसाळकरांनी लागलीच महाराजांना आपल्या घरी ‘म्हैसाळ’ येथे मुक्कामास येण्याची विनंती केली तेव्हा श्रीकृष्ण सरस्वती महाराजांनी त्यास ‘करवीर’ येथे एक काम आहे ते करून तुझ्या घरी येऊ असे सांगितले.

महाराज म्हैसाळकरांसोबत कोल्हापुरातील कुंभारगल्ली परिसरात आले आणि तेथे राहणाऱ्या ताराबाई शिर्के यांच्या दरवाजात आगंतुकासारखे उभे राहून ‘आई मी आलो. आई, मला जेवायला वाढ. असे मोठमोठ्याने ओरडू लागले. अपरिचित आवाज कानावर पडल्याने अचंबित झालेल्या ताराबाई बाहेर आल्या तेव्हा महाराजांनी त्यांच्यापाशी जेवण देण्याचा आग्रह धरला. त्यांच्या वागण्यातील निर्मळता ताराबाईंना भावली. परंतु आपल्यासारख्या सामान्य स्त्रीने या तेजस्वी बालमुर्तीला शिजवलेले अन्न द्यावे त्यांना प्रशस्त वाटले नाही. असे असले तरीही दरवाजात अतिथीरूपाने आलेल्या पाहुण्यास निदान कोरडा शिधा तरी द्यावा या हेतूने त्या स्वयंपाकघराकडे वळल्या तोवर इथे महाराजांनी विचित्र लीला केली. म्हैसाळकरांचा हात धरून ते जलदगतीने तेथून निघाले आणि म्हैसाळकरांच्या गावी पोहोचले. श्रीकृष्ण सरस्वतींच्या आगमनाने म्हैसाळकर कुटुंबीय आनंदित झाले. पुढे बरेच दिवस महाराजांनी ‘म्हैसाळ’ येथेच मुक्काम केला.

ताराबाई प्रखर दत्तभक्त होत्या. दर पौर्णिमेला नरसोबावाडीला जाऊन अन्नदान करण्याचा त्यांचा नेम होता. पुढे कालातंराने पौर्णिमेचा दिवस उगवला. ताराबाईंनी अन्नदानासाठी वाडीला जाण्याचे ठरविले. नेमके प्रवासात असताना त्यांचे पोटशुळाचे जुने दुखणे उद्भवले. वेदनेने तळमळत का होईना ताराबाईंनी वाडी गाठली. अन्नदान केले पाऊल पुढे टाकवत नव्हते तरीही नित्यकर्मे आटोपली आणि महाराजाना प्रार्थना केली कि महाराज आज तुमचे शेवटचे दर्शन घेते कारण इथून पुढे वाडीला यायला जमेल असे वाटत नाही आणि त्यांना झोप लागली.

ताराबाईंना झोपेत असताना स्वप्नदृष्टांत झाला. श्रीदत्तगुरु प्रकट होत त्यांना सांगते झाले. ‘ अगं, आम्ही तुझ्या दारी आलो होतो परंतु आम्हांस तू जेवू घातले नाहीस. उगीच शंकाकुशंका घेत कोरडा शिधा आणण्याची खटपट करीत राहिलीस. आम्हांस तुझ्या घरी घेऊन जा. आम्ही म्हैसाळ येथे आहोत आणि यापुढे तुला येथे येण्याची गरज नाही. घरी राहूनच सेवा करीत रहा.’

अनपेक्षितपणे घडलेल्या दृष्टांतलाभामुळे आनंदित झालेल्या ताराबाईनी पहाटे उठून लागलीच श्रीदत्तात्रेयांचे दर्शन घेतले. वाडीतील नित्योपचार आटोपले अन् त्या म्हैसाळ येथे आल्या. गावामध्ये येताच त्यांनी म्हैसाळकरांचे घर गाठले तेव्हा श्रीकृष्ण सरस्वती त्यांना हसतहसत सामोरे गेले. ताराबाईंनी आधीच्या प्रसंगाबद्दल माफी मागितली तेव्हा महाराजांनी आनंदाने ताराबाईंचे दोन्ही हात आपल्या ओंजळीत धरले आणि त्यांना म्हणाले “आई... आई ... मी आता तुझ्या घरी येतो.”

बालोन्मत्तपिशाच्च वृत्ती धारण केलेले हे श्रीदत्तात्रयांचे जाज्वल्य अवधूतरूप ताराबाईंचे बोट धरून कुंभारगल्लीस परतले. ‘ तारा सदन’ चा उंबरठा ओलांडून घरात प्रवेश करणारे श्रीकृष्ण सरस्वती आपल्या देहाची समाप्तीसुद्धा तेथेच करते झाले. या संपूर्ण कालावधीमध्ये ताराबाईंनी महाराजांची काळजी वाहिली. सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत महाराजांना न्हाऊमाखू घालण्यापासून जेवण भरविण्यापर्यंतचे सर्व सोपस्कार ताराबाईंनी आईच्या मायेने केले माऊलीस्वरूप होऊन जगाचा सांभाळ करणाऱ्या श्रीकृष्ण सरस्वतींनी स्वतःचा प्रतिपाळ करण्यासाठी मात्र ताराबाईंच्या कुशीत विसावा घ्यावा यातच ताराबाईंचे मोठेपण आणि श्रेष्ठत्व सामावलेले आहे.

‘कुंभारगल्लीचे स्वामी’ म्हणूनही परिचित असलेले श्रीकृष्ण सरस्वती साक्षात दत्तावतार आहेत तसेच त्यांचा उल्लेख सर्वत्र ‘श्रीदत्तमहाराज’ म्हणूनच केला जातो. त्या काळातील अनेक तत्कालीन संतश्रेष्ठांशी श्रीकृष्ण सरस्वतींचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते. श्रीरांगोळी महाराज, श्रीनामदेव महाराज चव्हाण, श्रीबालानंद, श्रीनिळकंठ, श्रीबालमुकूंद यांसारखे अधिकारी सत्पुरूष आणि कृष्णा लाड, वासुदेव दळवी, कृष्णा स्वार, वेणीमाधव , रामदास , रामभाऊ फारिक, म्हादबा पटकर , गोविंद व्यास, बाळकृष्ण राशीवडेकर यांसारखे अंतरंगातील भक्त ही श्रीकृष्ण सरस्वती महाराजांची ‘ संचित ठेव’ आहे.

कै. गणेश मुजुमदार आणि बाळासाहेब शिर्के लिखित चरित्र ग्रंथांनी अजरामर केलेले श्रीकृष्ण सरस्वतींचे अलौकिक अवतारकार्य २० ऑगस्ट १९०० रोजी लौकिकार्थाने पूर्ण झाले असले तरीही कुंभारगल्लीच्या ‘तारासदन’ मध्ये अजूनही ते समाधीरुपाने जागृत आहे.