Admin
11/14/2021 5:30:29 PM
लेखक : श्री. बजरंग झेंडे
चरित्र : समुद्र भरला आहे
संदर्भ : कै. बाळासाहेब रामनाथ शिर्के लिखित श्री कृष्ण सरस्वती चरित्र
(महानैवेद्य सेवा,ग्रुप,कोल्हापूर)
श्री क्षेत्र करवीरच्या पूर्वेस करवीर पासून ४३ कि.मी. शिरोळ पासून ५ कि.मी. श्री नृसिंहवाडी पासून ७ कि.मी. नांदणी नावाचे एक खेडेगाव आहे. या नांदणी गावात भारद्वाज गोत्री आप्पाभट जोशी या नावाचा एक धार्मिक, सदाचार संपन्न ऋग्वेदी देशस्त ब्राम्हण राहत असे.त्याच्या पत्नीचे नाव अन्नपूर्णा असून, तिला काशीबाई सुद्धा म्हणत. ती महापतिव्रता असून श्री श्रीपाद श्रीवल्लभ यांची आई सुमती / सुमता व श्री नृसिंह सरस्वतींची आई अंबा भवानी यांची प्रतिछायाच होती.आप्पाभटांचा नित्यक्रम म्हणजे घरची पूजा-अर्चा करून उपजीविकेसाठी भिक्षुकी करणे,दर शनिवारी व दर पौर्णिमेदिवशी नृसिंहवाडीला जाणे,ग्रामजोशी असल्याने त्यांचे कायम वास्तव्य नांदणीतच असायचे.याशिवाय जांभळी व हरोली ही गावे भिक्षुकेसाठी होती. आप्पाभटांचा व अन्नपूर्णा देवींचा विवाहसोहळा पार पडला. विवाहानंतर तृप्त अंत:करणाने शुभाशिर्वाद देऊन अन्नपूर्णा देवीकडील वऱ्हाड जांभळी गावी परतले. ते सुद्धा जड अंत:करणाने. परंतु जोशी कुटुंब पूर्ण संस्कारीक असलेने ते समाधानी होते.
अन्नपूर्णा देवी सासरी आनंदाने रमू लागल्या. पती उठण्याच्या अगोदर उठणे, सडासंमार्जन करणे, तुळशी वृंदावनाजवळ सुबक रांगोळी काढणे, तुळशीला प्रदक्षिणा घालणे व घर आरशाप्रमाणे स्वच्छ ठेवणे, स्वत:ची कामे स्वतः करणे हे सर्व बघून सासू सासरे व पती यांना समाधान लाभत होते. आप्पाभटांना पूजेसाठी स्वच्छ घासलेली भांडी, सुगंधी फुले, गंध उगाळून देणे हा घरगुती नित्यक्रम नेहमीच चालू असायचा. बघता बघता संसाराला ४ ते ६ वर्षे झाली. संसार अतिशय सुखाने व आनंदाने चालला होता. आपल्या संचितात जे आहे ते मिळणारच मग देवाकडे मागणी कशासाठी करायची ?अशा स्थितप्रज्ञ वृतीने ते राहत असत. आप्पा भटांच्या काया वाचा मने कार्यात अन्नपूर्णा देवी सहभागी होत असत. एकाध्याची इच्छापूर्ती, अतिथी सेवा, पददलितांना आधार,वृद्ध सेवा,रुग्णसेवा व देखभाल करीत असत. हे काम करती असताना भगवंतावरचे चित्त मात्र कायम असायचे. दर पौर्णिमा व दर शनिवारी नृसिंहवाडीला आप्पाभट पायी चालत जात असत. रात्रभर गुरुदत्ताच्या सानिध्यात राहून पहाटे संगमावर स्नान संध्या आवरून, प्रदक्षणा घालून, ऐपतीप्रमाणे दानधर्म करून,परतीच्या मार्गाने नांदणीला घरी परत येत. एके दिवशी अतिनम्रपणे अन्नपूर्णादेवी आप्पाभटांना म्हणाल्या “आपल्या घरी मी पूर्ण सुखी आहे. मी पूर्णपणे संसारात संतुष्ट आहे. परंतु पोटी संतती नसल्याने मन विषण्ण होते.नम्रपणे निवेदन करून मला आपणाला दु:खी करायचे नाही. आपणंच माझे परमेश्वर आहात, तुमच्या शिवाय मी कोणाकडे दु:ख कथन करणार ? माझ्या मनीच्या मनोव्यथासाठी आपणंच भगवान श्री दत्तात्रयसमोर प्रार्थना करावी.ते भक्त कैवारी-त्रिपुरारी प्रसन्न होऊन पुत्र देतील. त्याने संसार सुखाचा होईल”. आप्पाभट आपल्या पत्नीचे बोल ऐकून थोडा वेळ शांत राहिले व म्हणाले “अपत्य सुख कोणाला नको असते ? ते तर प्रत्येकास हवे असते. या गोष्टी विधाताच ठरवीत असतो. गुरूकडे साकडे घालून त्यांना संकटात टाकणे म्हणजे स्वार्थच आहे. हे दैवाधीन आहे. त्यासाठी गुरुंना त्रास देणे मला योग्य वाटत नाही”.यावर अन्नपूर्णादेवी आप्पा भटांना म्हणाल्या “गुरुंना संकटात टाकणे उचित नाही, हे मला पटते.पण आत्मनिवेदन हा सुद्धा एक भक्तीचाच भाग आहे. माझ्या वतीने माझे आत्मनिवेदन श्री गुरुद्त्तांना निवेदन करावे म्हणजे स्वार्थाचा प्रश्न निर्माण होणार नाही”. अन्नपूर्णादेवीचे हे बोलणे आप्पाभटांना पटले.ते दर पौर्णिमेला व दर शनिवारी नृसिंहवाडीला जातच राहिले. एकदा नृसिंहवाडीला श्री दत्त दर्शनाला गेले असताना आप्पाभट भावावेषात गेले व नकळत त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले की श्री क्षेत्र गाणगापूर मुक्कामी जाऊन गुरु चरित्र सप्ताह करावा हे इष्ट होईल. बहुतेक हा श्रीदत्तगुरूंचा संदेश असावा. एकमेकांचे विचार समजावून घेवून आप्पा भट व अन्नपूर्णादेवी उभयंता श्री गाणगापुरास गेले.सात दिवस अनुष्ठान करून गुरुचरित्र सप्ताह पूर्ण केला व नांदणीला घरी परत आले. पुन्हा नेहमीप्रमाणे आप्पाभट श्री नृसिंहवाडीला श्री दत्तदर्शनाला गेले असता ते मनोमन श्री गुरुदेव दत्तांना म्हणाले “हे गुरुदेवा दत्तात्रया माझे मन निर्मळ आहे.माझी कांही सुद्धा मागण्याची इच्छा नव्हती. पण पत्नीच्या इच्छेखातर तिला एक पुत्र संतान दे. तू कृपासागर गोविंद असून, तू साक्षात कल्पवृक्ष आहेस.मी तुझे स्तवन करण्यास असमर्थ आहे”. एवढी याचना करून आप्पाभट भोजन करून झोपी गेले.झोपेत असताना त्यांच्याजवळ एक यतीपुरुष आला व म्हणाला “चिंता करून नकोस मी तुझ्या घरी स्वतः पुत्र म्हणून जन्म घेईन”.आप्पाभटांना मागे ११-१२ व्या पिढीच्या दरम्यान श्रीपाद श्री वल्लभ यांनी दिलेल्या आशिर्वादाची आठवण झाली व सत्यताही पटली.या स्वप्नाने आप्पा भटांना जाग आली.संगमावर स्नानसंध्या आटपून स्वप्नात झालेल्या दत्त दर्शनाने प्रसन्न चित्त होऊन नृसिंहवाडीतील दत्त दर्शन घेऊन स्वतःच्याच नादात आप्पाभट घरी जाणेस निघाले. श्री दत्त चरणी तल्लीन होऊन कोणाशी ही न बोलता घरी पोहचले. घरी आल्यावर अन्नपूर्णा देवींना वाडीत घडलेला सर्व वृतांत सांगितला.अन्नपूर्णा देवींना मनस्वी आनंद झाला.उभयंता दोघेही अपत्य मुखाच्या दर्शनाच्या अपेक्षेने दत्त चरणी सेवेत मग्न होऊ लागले. हे सात्विक दांपत्य आसक्ती न ठेवता गुरुपूजा, गुरुध्यान व गुरुसेवेच्या कार्यात मग्न असतांनाच त्यांना अपत्याच्या येण्याची चाहूल लागली.आप्पाभटांनी श्री गुरूच्या चमत्काराची सत्यता लक्षात घेऊन साक्षात दत्त अवताराला सांभाळण्याचे सामर्थ्य निर्माण व्हावे म्हणून स्वतःस जास्त काळ दत्त भक्तीत व्यतित करण्याचे ठरवले.
दिन प्रति दिन उदरी गर्भ वाढतच होता. अन्नपूर्णा देवीच्या आनंदाचे रुपांतर गंभीरपणात होऊ लागले. त्यांच्या मुख कमलावर व सर्वांगावर एक सात्विक तेज वाढू लागले.हळू हळू त्या शांत व गंभीर दिसू लागल्या,त्यांची स्थितप्रज्ञ वृत्ती पाहून दैवी अंशच पोटी जन्म घेत आहे अशी खात्री झाली.आपण आई होणार हे ठाऊक असलेली प्रत्येक स्त्री आपले वागणे, आपले रहाणे व आपले खाणे-पिणे यांची जपणूक करीत असते.परंतु अन्नपूर्णा देवीची अवस्था मात्र वेगळीच होती.त्या स्थितप्रज्ञ व अबोल तर कधी स्वतःशीच स्वतः बोलत असत.केव्हाही मध्येच उठून संभ्रम अवस्थेत चालत जाऊन हनुमानाच्या पारावर बसत व हनुमानाशी बोलत असत.याचप्रमाणे श्री दत्तपादुका व इतर देवदेवता यांच्याशी बोलत असत.कांही वेळा त्यांचे वागणे भ्रमिष्टासारखे वाटायचे, शेजारच्या इतर बायका म्हणत “बऱ्याच दिवसानंतर ही गरोदर आहे म्हणून ही वेडी झाली की काय?”
आप्पाभट मात्र हे सर्व शांतपणे बघत होते.आप्पाभटांना कळून चुकले की पत्नीच्या उदरी असलेला गर्भ तिला असे वागावयास लावतो आहे. तो गर्भच तिला म्हणजे स्वेच्छेने घेवून जातो व दैवताशी हितगुज करायला लावतो. आप्पाभटजी आपल्या समोर अन्नपूर्णादेवींना समोर बसवून घेवून दत्तस्रोते व दत्तस्तवने म्हणत असत. त्यावेळी अन्नपूर्णादेवी गंभीरच असत.पण दत्ताच्या आरतीच्या वेळी मात्र गर्भ स्थिर राहायचा. त्यावेळी अन्नपूर्णा शांत असत. दिवस भरा भरा चालले होते. आप्पाभटांच्या मनात ह्या सर्व गोष्टीचा विचार मनात चालू होता. अकारण मोहात अडकण्यापेक्षा परमेश्वर /श्री दत्तगुरु जे घडवतील तसेच होऊ दे, असे म्हणून स्थिर मनाने पहात बसत. नऊमास पूर्ण होताच प्रसुतीसमय जवळ येऊन ठेपला.शेजारील बायका जमल्या. त्या अन्नपूर्णादेवींना एकांतत घेऊन गेल्या, एकच वृद्ध बाई आत जवळ होती. सुईणीने बालक हातात घेतले व लगेचच खाली ठेवले.ती घाबरून पळत पळत बाहेर आली व थरथरू लागली.सुईणीला ते बालक विचित्र वाटले. शेजारच्या जमलेल्या बायकापैकी एक वृद्धा धाडस करून आत गेली व तिने तेज:पुंज सुडौल व सदृढ बालकास पाहिले. त्या बालकाला उचलून घेण्याचा तिला मोह झाला, तिने तेजपुंज बालक ऊचलून घेताच तिला आयुष्यभराचे श्रम एका क्षणांत नाहीसे झाल्याचे वाटले.तिला आत्मानंद प्राप्त झाला व ही वार्ता संपूर्ण गावात पसरली.संपूर्ण नांदणी गांव बालकास पाहण्यासाठी धावले. अशा रीतीने श्री श्रीपाद वल्लभांच्या आशीर्वादाने श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांचा जन्म इ.स.रविवार दि.७/०२/१८३६ म्हणजेच माघ वद्य पंचमी शके १७५७ रोजी झाला.