Admin
11/14/2021 4:58:34 PM
लेखक : श्री.बजरंग झेंडे
चरित्र : समुद्र भरला आहे
संदर्भ : कै. बाळासाहेब रामनाथ शिर्के लिखित श्री कृष्ण सरस्वती चरित्र
महानैवेद्य सेवा ग्रुप,कोल्हापूर
या पहिल्या अध्यायात स्वर्गीय बाळासाहेबांनी मंगल चरण गायिले असून, सर्वांना वंदन करून ग्रंथ निर्मितीचा उद्देश कथन केला आहे. सदर मंगल चरणावर कथाकल्पतरू ग्रंथातील “ईशस्तवन” ची छाया आहे. गुणातीत सर्वेश्वर सर्व गुणांचा राजा विघ्ननाशक असा जो गणपती, त्या गणपतीला ग्रंथारंभी मी अंतःकरणपुर्वक साष्टांग प्रणाम करून “ हे परात्पर भगवान गणनाथा तू अनादी व अनंत असून, सर्वत्र आहेस. सर्वास कार्यकारण तूच असून करताही तूच आहेस. अशा प्रकारे विघ्नहर्ता श्री गणरायाचे स्तवन करून श्री सरस्वती, कुलदैवत तुळजा भवानीला माता – पिता – श्री गुरु कृष्ण सरस्वतींना वंदन करून आशीर्वाद मागितला आहे. वाचक हो आपण ज्ञानवंत व सुशील असून आपल्या हृद्यात समता आहे. श्री हरीचे दास आपल्या हृदयात कधीही किल्मिष बाळगीत नाहीत. त्यांची हृदये आरशा प्रमाणे स्वच्छ असतात.आपणही अशाच निर्मल अंत:करणाने या ग्रंथाचे परिशीलन कराल असा मला भरवसा आहे. निर्मळ पाणी जसे कोणत्याही रंगाचे होते, त्याचप्रमाणे आपणही आपले निर्मळ अंत:करण भक्तीरसाने रंगवून या माझ्या ग्रंथाकडे पहावे अशी माझी तुम्हाला विनंती आहे.
भगवंताच्या लीला श्रवणाची उत्सुकता साधारणतः सर्वाना सारखी आहे. त्या लीला गोड आहेत. संस्कृत भाषेत आहेत. अवघड आहेत. संस्कृत भाषा फार थोडे लोक जाणत असल्यामुळे कृष्ण कवींनी हा ग्रंथ (कथा कल्पतरू) प्राकृतात केला. या ग्रंथात वेद, श्रुती, स्मुती, उपनिषिदे यातील सार प्राकृतात वर्णन केले आहे. ईश्वर प्राप्त आजे जे व्यास, वाल्मिकी, शुक यांनी महाभारत, रामायण, श्रीमद्भागवत व अठरा पुराने असे वेद्तुल्य ग्रंथ संस्कृतात करून ठेवले आहेत. त्या ग्रंथातील कथा मी प्राकृतात वर्णन करण्याचा प्रयत्न करीत आहे, असे कृष्ण कवी म्हणतो. अशा व्यास, वाल्मिकी, शुक, मुनी व कृष्ण कवींना स्व. बाळासाहेबांनी वंदन केले आहे. तहानेने व्याकुळ असलेल्या गृहस्थास पाण्याची खोल विहीर दिसावी पण पाणी वर काढण्यास जवळ पात्र व दोर असू नये. त्याप्रमाणे प्राकृत हरीभक्तांची स्थिती झाली आहे. अशा प्राकृत जनांसाठी मी पात्र व दोर होवून तो खोल असलेला संस्कृत ज्ञानसागर उपसून वर आणत आहे. हा ज्ञानसिंधु फार विशाल आहे. तो उपसीत असताना जर काही चुकून राहिले तर सहृदय वाचकवृंदहो मला तुम्ही क्षमा करा. स्वर्ग मृत्यु पाताळाचे तिन्ही ठिकाणच्या लोकांनी कथामृत सेवनाचा प्रयंत्न केला आहे आणि असा प्रयत्न आजवर एकसारखा चालत असल्यामुळे भगवंताचे लीलालाघव चरित्र सर्वांना उपलब्ध झाले आहे. श्रीहरीच्या अनंत लीला पाताळात कंबल व अश्वतर यांनी वासुकीला सांगितल्या होत्या, स्वर्गात सुरपतीला बृहदश्वाने सांगितल्या होत्या. त्याच कथा एकदा कैलासात असताना शंकराने पार्वतीला कथन केल्या होत्या. बद्रीकाश्रमी त्या सुतांनी ऋषींना सांगितल्या होत्या, याप्रमाणे परंपरेने त्या कथा अनेकांनी अनेकांस सांगितल्या आहेत. राजा जनमेजय वैशपायन ऋषीस कथा विचारात असून वैशपायन ऋषी त्या कथा राजा जनमेजयाला सांगत आहेत. त्या कथेतीलच एक द्वापार युगातील श्री दत्तात्रेय अवताराची होय.
श्री अत्रिऋषींनी पुत्र प्राप्तीसाठी ऋक्षाकुल पर्वतावर घोर तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येने त्रिभुवन होरपळू लागले. अत्रिऋषीच्या या घनघोर तपश्चर्येने प्रसन्न होवून ब्रम्हा – विष्णू – महेश हे त्याच्या समोर प्रकट झाले. ते प्रकट होवून वर माग म्हणताच “अत्रिऋषींनी” आपण माझ्या उदरी जन्म घ्यावा हे मागितला. श्री ब्रम्हा – विष्णू – महेश यांनी यावर तथास्तू म्हणून त्याच्या पोटी येण्याचे मान्य केले. त्याप्रमाणे ब्रम्हदेवापासून सोम (चंद्र), विष्णूपासून दत्त शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसूयेच्या पदरी जन्मले. तथापी, द्वापार युगातील नारदाने केलेल्या अनुसूयेच्या सतीत्वाच्या गौरवामुळे श्री ब्रम्हा – विष्णू – महेश यांच्या पत्नीच्या मनात (नावे – लक्ष्मी, पार्वती, सरस्वती) अनुसूये विषयी द्वेष निर्माण झाला. अनुसूयेच्या सत्व हरणासाठी त्यांनी आपल्या पतींना अतिथि वेषात अनुसूयेच्या आश्रमात पाठविले. अत्रिऋषी त्यावेळी आश्रमात नव्हते. दोन प्रहरी भिक्षेला आलेल्या अतिथीला कोणत्याही परिस्थितीत भिक्षेशिवाय विन्मुख पाठवायचे नाही असा नियम अत्रिऋषी व अनुसूयेचा होता. श्री ब्रम्हा – विष्णू – महेश अत्रिऋषींच्या आश्रमात भिक्षेसाठी माध्यान्ह काळी आले. अनुसूयेने त्यांना विसाव्याची विनंती केली, आदरातिथ्य केले. तथापी सत्वहरणाच्या उद्देशानी आलेल्या श्री ब्रम्हा – विष्णू – महेशांनी तिला सांगितले की, तू विवस्त्र होवून भोजन वाढत असशील तरच आम्ही भिक्षा स्वीकारू,भोजन स्वीकारू अनुसूया थोडी गडबडून गेली, गोंधळून गेली, परंतु देवांच्या भिक्षेची अट मान्य करून श्री अत्रिऋषीचे स्मरण करून तिने त्या तिन्ही देवांवर तीर्थ शिंपले. त्याबरोबर ते तिन्हीही ब्रम्हा – विष्णू – महेश देव लहान बाळे झाली. इकडे स्वर्गात तिन्ही देवांच्या पत्नी देवांची वाट पहात बसल्या. शेवटी नारदाच्या सांगण्यावरून पतिदेवांचा शोध घेत त्या अत्रिऋषींच्या आश्रमात आल्या.आपले पतीदेव श्री ब्रम्हा – विष्णू – महेश हे बालरूपाने पाळण्यात झोपले असून, अनुसूया पाळण्याला झोके देत आहे, हे पाहून त्या गहिवरून गेल्या. अनुसुयेच्या पतिव्रताचा त्यांनी गौरव केला.स्तुती केली व आपल्या पतीदेवांना बाल्ररूपातून सोडविण्याची विनंती केली. श्री पतीस्मरण करून तीर्थ शिंपडताच तिन्ही बाळे पुन्हा पूर्ववत देव झाली. तिन्ही देवांचे देवीचे दर्शन अनुसूयेला झाले. तिन्ही देवांना पूर्वरूप प्राप्त झाले तेही गहिवरून गेले व त्यांनी अनुसुयेला वर मागण्यास सांगितले. अनुसूयेने ब्रम्हा – विष्णू – महेश या तिन्ही देवांनी तिच्या इच्छेनुसार तिच्या पोटी जन्म घेण्याचे मान्य केले.अशाप्रकारे श्री माता अनुसूया – श्री अत्रिऋषी यांच्या पोटी श्री दत्तात्रयाने जन्म घेवून श्री दत्त परंपरेचे सूत्र चालू राहिले असे पहिल्या अध्यायात स्व. बाळासाहेब सांगतात.आपले पिता श्री अत्रिऋषींच्या सहवासात गौतमी नदीच्या तीरावर तपश्चर्या करून श्री दत्तात्रयांनी ब्रम्हज्ञान प्राप्त केले. दत्तात्रयांनी चोवीस गुरु केल्याचा उल्लेख भागवतात आढळून येतो. पृथ्वी, आकाश, पाणी, अग्नी, सूर्य, पतंग, अजगर, समुद्र, मधमाशी, पिंगळा, कुमारी, मासा, भिंगुरटी, कोळी, बालक वरील चराचराकडून दत्तात्रयाने गुण घेतले आहेत. म्हणून संत एकनाथ महाराजांनी अभंगात खालील प्रमाणे म्हंटले आहे
जो जो जयाचा घेतला गुण I तो तो म्यां गुरु केला जान I
गुरूसी आले अपारपण I जग संपूर्ण गुरु दिसे II
ज्याचा गुण घेतला I तो सहज गुरुत्वा आला II
ज्याचा गुण त्यागरुपी घेतला I तोही गुरु झाला अहितत्यागे II
तो अवधूत जाण दत्तात्रेया I तेणे अलीगुनी यदुराया I
निजरूपाचा बोध तया I अनुभवावया दिधला II
श्री दत्तात्रय अत्रि – अनुसूयेचा पुत्र, वेदकाळापासून त्याचे अवतार कार्य चालू राहिले आहे. १) योगीराज २) अत्रीवरद ३) दत्तात्रेय ४) कालग्रीश्मन ५) योगीजन वल्लभ ६) लीलाविश्वंभर ७) सिद्धराज ८) ज्ञानसागर ९) विश्वंभर १०) मायामुक्त ११) मायायुक्त १२) आदिगुरु १३) शिवरूप १४) देवदेव १५) दिगंबर १६) कृष्णशामकमलनयन
हे सोळा अवतार झाले तर सहस्त्रार्जुन, कार्तवीर्य, परशुराम, यदु, अर्लक, आयू व प्रल्हाद हे पौराणिक शिष्य झाले.
वेदकालीन अवतारा नंतर श्री श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नुर्सिंहसरस्वती हे मानवी देह धारण करणारे, योगमार्गाचा उपदेश करणारे दत्तावतार झाले. त्यांच्यानंतर श्री माणिकप्रभू हुमनाबाद, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट, श्री श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज (नांदणी / कोल्हापूर) असे परंपरेने अवतार कार्य पहिल्या अध्यायाच्या ओवीत सांगितले आहे.