अध्याय ७ वा ताराईना भक्तीचा गर्व झाला व तो श्रीकृष्ण सरस्वती महाराजांनी हरण केला.

 

लेखक : श्री. बजरंग झेंडे

चरित्र : समुद्र भरला आहे

संदर्भ : कै. बाळासाहेब रामनाथ शिर्के लिखित श्री कृष्ण सरस्वती चरित्र

(महानैवेद्य  सेवा ग्रुप, कोल्हापूर)

(१) ताराईना भक्तीचा गर्व झाला व तो श्रीकृष्ण सरस्वती महाराजांनी हरण केला.

“माझ्या भक्तीसाठी महाराज इथे आले महाराजांना इथून हलविण्याचे रामदास, हरिपंताचे प्रयत्न माझ्या साठीच महाराजांनी निष्फळ ठरविले. मी भरवताच महाराज जेवतात माझ्या शब्दांकित महाराज आहेत”. हा फाजील अभिमान तारामतींचा दिवसेंदिवस वाढतच जाऊ लागला. महाराजांच्या सेवक वर्गावर सारासार विचार न करता त्या गुरुगुरु लागल्या. महाराजांना तारामतींच्या स्वभाव आचरणात पडलेला फरक आवडला नाही. ते तारामतींना चिन्मयपणे तर इतर भक्तांच्या अनुषंगाने प्रगट प्रगल्भपणे बोलत असत. पण तारामतींना ते  उमगत नसे, किंवा ते जाणून घेण्याची कधी इच्छाही बाळगली नसेल व म्हणूनच की काय मग एकदा महाराजांनी विपरीत घडविले. माघ मास शिशिर ऋतू मकर संक्रमण म्हणून कोल्हापूर जवळील चिखली ह्या गांवी प्रयाग तीर्थ स्नानारंभ होता. कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती, सरस्वती अशा पांच नद्यांचा संगम झाला म्हणून ह्या पंचगंगेच्या तीर्थ स्नानास एक महिन्यात काल १४ जानेवारी ते १४ फेब्रुवारी पर्यंत दरवर्षी मानला जातो त्या पर्व काली लाखो भाविक तीर्थ स्नानाचे पुण्य लुटत असतात. ह्या प्रयाग संगमी महाराजांच्यासह आपण सर्व भक्तांनी तीर्थ स्नान करून भोजन प्रसादाचा आस्वाद घ्यावा असा विचार विश्वाचे सूत्रधार महाराजांच्याच प्रेरणेने कोण्या एका भक्तास सुचला व त्याला तारामतींसह सर्व इतर भक्तांनी पण मान्यता दिली. समय दिवस ही आयोजित करण्यात आला. कृष्णा स्वार व कृष्णा लाड ह्या उभय सेवकांच्या खांद्यावर आळीपाळीने बसून तारामतींसह सर्व भक्तांच्या समवेत महाराज प्रयाग संगमी आले. तीर्थ स्नान करण्यास श्री गुरुंनी भक्तास सांगता, सर्व भक्तांचा आग्रह झाला की, “देवा तुम्हीच आधी गंगा स्नानास चला !” भक्तांची विनवणी पाहून मंदस्मित करत श्री गुरु गंगेच्या काठावर आले. सर्व भक्तांना आनंद झाला. पण महाराज तेथे कांही काळ स्तब्ध उभे राहिले कांही केल्या ते पाण्यात उतरेनात. खाली तीन पायरीवरून गंगा माई संथपणे वाहत होत्या ! काठावर महाराजांना परत भक्तवृंदाने स्नान करण्याचा आग्रह करत असतांनाच संथ वाहणाऱ्या गंगा लहरींनी आतुरतेने उसळी घेऊन फक्त श्री गुरु चरणा भोवतीच किंचीत काळ फेर धरला नव्हे तर ती पंचगंगामाईनी मारलेली ती श्री गुरु चरणाला मिठी भक्तांनी पाहिली. त्याच क्षणाला सर्व भक्तांच्या अंत:करणातील भक्तीने एकच अति उंच स्वर पकडला.“श्री कृष्ण सरस्वती दत्त महाराज की जय” “झाले ! झाले ! गंगास्नान आमुचे झाले !” असे महाराज म्हणाले व वरती येऊन एका वृक्षछायेत बसले. कांही भक्तांनी तीर्थस्नान करून त्वरेने जे काम मिळेल ते करू लागले, तारामती समाराधनेचा बेत योजत होत्या ! कोणी भक्त मंडप उभा करत होते. कोणी भक्त गंगा नीर आणून धावपळ करीत होते. कृष्णा स्वाराना अपस्मारीचा केंव्हा केंव्हा त्रास होई म्हणून ते नुसते महाराजांचे नामस्मरण करत होते. तर कृष्णा लाड व वासुदेवराव दळवी दोघे महाराजांचे चरणसेवा करीत महाराजांचे चिंतनात दंग झाले होते.महाराज अवचितपणे उठून ह्या लाड दळव्याना म्हणाले “चला ! चला ! उठा ! अंगी वैराग्य धैर्याचं बळ धरा आणि सांभाळ करण्याची प्रार्थना करा दत्ता जवळ आणि चला आता आपल्याला फार दूर जायचं आहे. तारेला जागे करूया ! चला ! चला !” असे म्हणत महाराज धावत सुटले. गोंधळलेल्या मन:स्थितीत लाड व दळवी महाराजांच्या पाठोपाठ धावत जाण्यापलिकडे कांहीही करू शकत नव्हते ! महाराजांनी नजिकच्या एका दुकानात येऊन एक मूठभर चिरमुरे घेऊन ते तारामतींच्या जवळ येऊन ते देत म्हणाले “आई हे घ्या !हेच तुम्हांला गोड वाटेल म्हणून आधी तुम्हांला देत आहे ! ते घ्या आता इथून पुढे आमच्यावर शब्द ठेऊ नका ! तुमचे तुम्ही निज कर्म बध्द झाला आहांत !” असे प्रगल्भ भाष्य करीत महाराजांनी तेथून पळ काढला ! त्यांच्या पाठोपाठ लाड व दळवी पण धावत गेले! आडवळणी ते तिघेजण पळत गेले. हां हां म्हणता जे गेले ते गेलेच, दृष्टीआड झाले. पाठलाग करण्यासही ते कुणाला शक्य झाले नाही. तारामती तर अवाक झाल्या. त्यांना काय घडले आहे हेच कांही समजेना. कोणत्याही बाबतीत कोणत्याही प्रसंगी महाराजांना अटकाव वा मज्जाव करण्याचा अधिकार तारामतींना त्यांच्याच गुरु कृपेमुळे अनायासे प्राप्त झाला होता. परंतु ह्या क्षणाला त्या दिगमुढ बनल्या गेल्या. काय घडे हे आज अकल्पित असे त्यांना ही म्हणावयाची पाळी आली.भांबावून गेलेल्या मन:स्थितीतून कांही काळाने त्या पूर्व स्थितीत आल्या. श्री गुरूंच्या वियोगाचं दु:ख त्यांना होरपळून काढू लागले. शोकाकुल मन स्थितीत ते त्या प्रत्येक भक्तांस महाराजांना शोधून आणण्यास सांगू लागल्या, आणतो आणतो असे म्हणून कांही जण शोधावयास गेले ते थकून भागून निराशपणे तारामतींच्या जवळ आले.

घोर अरण्यात बसून ऊन वारा पाऊस पाण्यात खडतर तपश्चर्या साधक तपस्व्यांना ज्या भगवंताचे दर्शन होत नाही तो परमात्मा श्रीकृष्ण सरस्वती रुपात प्रकट साकार होऊन गुप्त झाला असता तारामतींचे हेर त्यांना शोधून काढण्यासाठी दिवसभर वण वण भटकून आले. त्या हेरांचे दिवसभरांचे श्रेय वाया गेले.अश्रू ढाळून ढाळून तारामतींचे नेत्र सुजले. एका क्षणाच्या कालावधीत निद्रा ग्लानीमध्ये महाराज नेहमी प्रमाणे तारामतींच्या पुढयात उभे राहून म्हणाले.

“आई ! विवेक बळानं आता चित्त आवरा, प्राप्त प्रसंगात उचित काय ते पहा, जेवण प्रसाद व्यर्थ जाऊ देऊ नका, समस्त भक्तवृंद उपवासी आहे ह्यांची नोंद घेऊन त्यांच्यासह तुम्ही भोजन उरकून घ्या !” तारामती सावध झाल्या. जड अंत:करणाने गुरूंची आज्ञा म्हणून प्रसाद भोजन सर्वांनी घेतले.निद्राविरहीत रजनी सर्व भक्तांनी श्री गुरूंच्या चिंतन मननात काढली. दुसऱ्या दिवशी तारामतींसह सर्व मंडळी कोल्हापूरला परतली.

गाभाऱ्यात देव नाही.देहात आत्मा नाही. विश्व शून्य साक्षी झाल्यासारखे तारामतींना वाटू लागले. त्यांचे जेवण खाण्यावरचे लक्ष उडाले,विश्रांती झोप काळजीने महाराजांच्या सिंहासनापुढे त्यांनी निर्वाण मांडले.काही भक्तांनी त्यांना धीर देत सांगितले.“सीतामाईच्या शोधासाठी समस्त वानरगण दशदिशा धावला.आम्ही पण आता महाराजांचा ठाव ठिकाणा शोधण्यासाठी निघत आहे. तुम्ही धीर सोडू नका !”असे म्हणत कांही भक्त परत श्री गुरूंच्या शोधासाठी निघाले. अशानपान वीरहींत मांडलेल्या निर्वाण तारामतींच्या शोकाकुल अवस्थेत आठव्या दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास सिंहासनाधिष्ट महाराज तारामतींना मंजुळ स्वरात म्हणाले “अगं तारे ! कशाला निर्वाण मांडलेस ? उठ आधी आणि देह रक्षणासाठी का होईना थोडेसे जेव ! तुला तुझा अहंकार बाधला. प्रयागला गुप्त झालेल्या दिवसापासून २१ व्या दिवशी तू मला इथे बसलेले पाहशील उठ ! उठ ! आणि काही तर भक्षण कर ! असे म्हणत महाराज अंतर्धान पावले.अमृत संजीवनीचे उद्गार ऐकताच तारामतींच्या जीवात जीव आला ! महाराज परत एकविसाव्या दिवशी दर्शन देणार ह्या विचाराने त्या प्रफुल्लित झाल्या महाराजांची आज्ञा म्हणून त्यांनी मग भोजन पान सुरु केले.

“तुला तुझा अहंकार बाधला !” हे महाराजांचे शब्द तारामतींच्या कानात एक सारखे घुमत होते.श्री गुरुंना त्या न आवडणाऱ्या (अहंकाराच्या) साऱ्या घटना त्यांच्या मन:चक्षू पुढे उभ्या राहिल्या आता इथून पुढे तसे न वागण्याचा त्यांनी संकल्प केला. गुरूंचे भक्त ही गुरूंचीच संपत्ती आहे गुरूंचेच ते वैभव आहे. आपण त्यांचा अपमान केला ही चूक आता इथून पुढे कदापीही करणार नाही.

आम्ही आणि आमुचे दास I

भेदाचा यात ना लव लेश I

सोडा रे सोडा भ्रम नि:शेष I

गुरुवर्य खास असेती हे II२३II

हे गुरूंचे बोल लक्षात आले. गुरूंच्या भक्तामुळे माझ्या ह्या वास्तूला शोभा आहे. गृह नक्षत्रामुळे जशी चंद्राला तारांगणात शोभा मग माझ्या “तारेच्या ह्या अंगणात” श्री गुरुंना भक्ता मुळे शोभा नाही का ? ही शोभा हेच ह्या वैराग्य मठीचे ऐश्वर्य आहे ह्या प्रमाणे करत असलेल्या आत्म परीक्षणात तारामतींना आत्मबोध म्हणजेच “निजबोध” महाराजांनी दिला या निजबोधात महाराजांनी प्रतिक्षा महाराजांच्या चिंतनात त्या करू लागल्या ! हरीवेडया गोपिकांचे हरि विरही दु:ख श्री गुरूंच्या मुळे त्यांच्या वाटेला आले. महाराजांच्या विषयी त्यांच्या कुण्या भक्तांनी पण कसलीही वार्ता कळवली नाही. ते भक्त गांवो गांवे फिरत गेले, तेथील गावकरी त्यांना सांगू लागले.

“कोणी म्हणती परवा गेले I कुणी म्हणती काल देखिले”

आमुचे ग्रामी भोजन केले I न कळे पुढे काय झाले II२३II

असे राजापूर पर्यंत शोध काढत भक्त गेले. श्री रामभाऊ वैद्य यांनी गुरु आगमनाची इत्थंभूत माहिती त्यांना सांगितली. महाराज जिथे जातील जिथे राहतील जिथे जेवतील त्या त्या स्थानाला श्री क्षेत्र नृर्सिंहवाडीचे मान महत्व प्राप्त होई. रामभाऊ वैद्य मोठया भाग्याचे म्हणून महाराज त्यांचे घरी येऊन राहिले. “उभ्या राजापूर गांवाने त्यांना पूजले अत्यंत प्रीतीने ओवाळले, आता ते वासुदेवराव दळवी व कृष्णा लाडा समवेत कागलला हरिपंत शिद्नेर्लीकरांकडे गेले आहेत !” असा समग्र वृत्तांत तारामतींना एका भक्ताने पत्राने कळविला.महाराज प्रयागला गुप्त झाल्यानंतर हरिपंत वैराग्यमठी सोडून कागलला त्यांच्याकडे आलेले आहेत. ही पत्रातून आलेली महाराजांची वर्दी लागताच तारामती अश्वयानातून हरिपंताच्याकडे आल्या. “महाराज आमच्याकडे काल पर्यंत होते. त्यांच्यासाठी आम्ही काल घरी मेजवानी केली व नंतर ते नृर्सिंहवाडीला गेले आहेत आपण तिकडे जाता श्री गुरु निश्चितच भेटतील !” तारामतींनी तिकडे जाण्याचे ठरवले. त्यांच्या बरोबर दुसरे अश्वयान करून हरिपंत पण नृर्सिंहवाडीला आले. वाडीकरांनी तारामतींना सांगितले. “तुमच्या महाराजांच्या सारख्या दिव्य साक्षात्कारी समर्थ महापुरुष आमच्या ह्या वाडीत असावा, त्यांनी येथे कायमचाच वास करावा म्हणून दोनशेहून अधिक वाडीवासीयांनी त्यांना गराडा घातला ! पण व्यर्थ झाले. एवढया आम्ही सर्वांच्या तावडयातून त्यांनी आपला मार्ग हा काढलाच स्वत:च्या पादुका कृष्णा लाडांच्या हाती देऊन ते जलात उतरले व पाठोपाठ उभय दासांना येण्यास सांगितले”.ते जलात उतरून पुढे गेले त्यांच्या पाठोपाठ आम्हां कुणालाही जाता येईना कारण तो कृष्णामाईचा डोह अति खोल आहे. महाराजांसह लाड दळव्यांना मात्र गुढघ्या एवढेच पाणी लागलेले आम्हाला दिसून आले. अत्यंत खोल डोहाच्या पाण्यावरून उभय दासासह चालत गेलेल्या ह्या त्रयमूर्तीकडे आम्ही हताश होऊन नुसते पहातच राहिलो. मिरज ग्रामीचा मार्ग लक्षून महाराज गेले आहेत तेंव्हा तेथे गेल्यावर आपल्याला ते भेटतील !”  “आपल्या मार्गात अजून दैव आड येत आहे” असे तारामती म्हणाल्या. त्या वेळी तिन्ही सांज झाल्यामुळे तेथेच वस्ती करून दुसऱ्या दिवशी मिरजेला जाण्याचे ठरवले. “तू इकडे येऊ नको मीच तुझ्या कडे येतो” श्रीपाद श्रीवल्लभ रूपातील ते अमृतोद्गार तारामतीना आठवले त्या प्रमाणे महाराज त्यांच्या घरी येऊन राहिले. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी आज वाडी पाहिली. गुरुचरित्रातील महिमा व महाराजांनी केलेल्या व प्रत्यक्ष पाहिलेल्या दिव्य लीलांच्या स्मृती मध्ये तारामतींनी ती रात्री काढली. त्यावेळी विसाव्या दिवसाची समाप्ती झाली होती. दुसऱ्या दिवशी महाराज मिरजेहून कोल्हापूरला आले आणि तारामती वाडीहून मिरजेला गेल्या. मिरजेहून महाराज कोल्हापूरला निघून गेले आहेत हे समजताच मग मात्र हतबल होऊन मनोमनी प्रार्थना करत महाराजांना म्हणाल्या. “काय हे गुरु माऊली किती तुला शोधू ? एवढा अंत कशाला गुरुराया पाहतोस ? गांवोगांव फिरून शोधून शोधून थकले. परमावधी झाली जाते कोल्हापूरला !”  ह्या विचारांबरोबर महाराजांनी सांगितलेले वचन तारामतींच्या लक्ष्यात आले. “प्रयागहून गुप्त झालेल्या दिवसा पासून एकविसाव्या दिवशी तू मला इथे सिंहासनाधिष्ट झालेला पाहशील !” तो एकविसावा दिवस उजाडलाच होता आणि मिरजेहून तारामती कोल्हापूरला त्यांच्या वैराग्य मठीत येऊन दाखल झाल्या. महाराजांनी दृष्टांत खरा करून दाखविला होता. महाराज सिंहासनावर विराजमान झाले असून दोन बाजूला जय विजया प्रमाणे वासुदेवराव दळवी व कृष्णा लाड विनम्रपणे हात जोडून उभे होते. तारामतींनी महाराजांना असे पाहताच महाराज म्हणून आर्तभावनेने चरणांवर लोटांगण घातले. नंतर गहिंवरलेल्या शब्दात महाराजांना प्रार्थित म्हणाल्या.

आता हेची मागणे देवा I वियोग ऐसा कधी न व्हावा

मरण येता दु:ख न जीवा I परी न बरवा जाच हा II५४II

नंतर तारामतींनी महाराजांचे चरण प्रक्षालन करून पंचारती केली.मग षड्रस पक्वानांचे भोजन करून स्वहस्ते त्यांच्या मुखी भरविले आणि नंतर महाराज शयनागारी निद्रीस्त झाले.मग कृष्णा लाडांना तारामतीनी अगदी जिज्ञासूपणे महाराज प्रयागातून गुप्त झाल्यापासूनची हकीकत विचारली. लाडानी पण ते सर्व प्रवास वर्णन करून सांगितले.